लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जळगाव: महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक संघातर्फे रविवारी रावेर तालुक्यातील सावदा येथे पहिली राज्यस्तरीय केळी परिषद आयोजित करण्यात आली असून, यात राज्यभरातील विविध तज्ज्ञ शेतकर्यांना मार्गदर्शन करणार आहेत. केळीला हमीभाव मिळण्यासह उत्पादकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी परिषदेत विचारमंथन करण्यात येणार आहे. तसेच राज्यात एकरी तीन टनांपेक्षा अधिक उत्पादन घेणाऱ्या केळी उत्पादकांना गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती संघाचे संस्थापक अध्यक्ष किरण चव्हाण यांनी दिली.

राज्यातील केळी उत्पादकांची सद्यःस्थिती बरीचशी नाजूक असून, अवकाळी पाऊस, गारपीट, रोग, बनावट रोपे, बनावट कीटकनाशक औषधी, तसेच विमा कंपन्यांनी व व्यापार्यांकडून होत असलेली शेतकर्यांची पिळवणूक या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी केळी शेतीतील तज्ज्ञ शेतकरी आणि पूरक उद्योजकांनी या परिस्थितीवर चर्चा करून ठोस उपाययोजना सुचविण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठीच केळी भागातील सावदा येथील प्रभाकर बहुद्देशीय सभागृहात रविवारी सकाळी ११ वाजता राज्यस्तरीय केळी परिषद घेण्यात येत आहे.

हेही वाचा… जळगावसाठी लवकरच १२१ इलेक्ट्रिक बस; जळगाव, पाचोरा, चोपडा, मुक्ताईनगर येथे चार्जिंग केंद्र

परिषदेत केळी उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. केळी पीकरोग नियंत्रण व सेंद्रिय शेतीचे तज्ज्ञ डॉ. प्रशांत नाईकवाडी आणि नंदलाल वसेकर हे निर्यातक्षम केळी व सूक्ष्म अन्नद्रव केळीचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करतील. परिषदेस संघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ. राहुल बच्छाव-पाटील, मार्गदर्शक विजयसिंह गायकवाड, तज्ज्ञ संचालक पंढरीनाथ इंगळे, रवींद्र डिगे, नामदेव वलेकर, कुबेर रेडे-पाटील, राज्य समन्वयक सचिन कोरडे, जिल्हाध्यक्ष राजेश नवाल, रावेर तालुकाध्यक्ष केतन पाटील आदी उपस्थित राहतील.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First state level banana conference in savada jalgaon on sunday dvr