लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्याकडे पाच वर्षांपूर्वी केवळ आठ ग्रॅम सोने होते. वार्षिक २० लाखांचे उत्पन्न असणाऱ्या वाजेंनी या काळात सोन्यात कुठलीही गुंतवणूक केली नाही. कारण, यावेळच्या शपथपत्रात त्यांच्याकडे तेवढेच सोने आहे. परंतु, या काळात त्यांची एकूण संपत्ती सुमारे पाच कोटींनी वाढून जवळपास १५ कोटींवर पोहोचली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अर्जासोबत सादर केलेल्या संपत्तीच्या विवरणातून ही माहिती मिळाली. पराग (राजाभाऊ) वाजे यांच्याकडे चल व अचल (स्थावर) अशी एकूण १४ कोटी ८० लाखांची संपत्ती आहे. विधानसभा निवडणुकीवेळी सादर केलेल्या शपथपत्रात ही संपत्ती १० कोटी २४ लाख रुपये होती. सद्यस्थितीत त्यांच्याकडे १३ कोटी २७ लाख ९१ हजारांची वडिलोपार्जित मालमत्ता आहे. तर स्वत: ३५ लाख रुपयांची संपत्ती खरेदी केली असल्याचे नमूद आहे. त्यांच्यावर १९ लाख १८ हजारांचे दायित्व आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे ७६ लाख सहा हजारांची चल संपत्ती होती. पाच वर्षात यात दुपटीने वाढ होऊन ती एक कोटी ५२ लाखांवर पोहोचली आहे.
आणखी वाचा-नाशिक : चांदवडनजीक बस अपघातात पाचपेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू
स्थावर मालमत्तेचा विचार करता २०१९ मध्ये त्यांच्याकडे आठ कोटी ६७ लाख ६९ हजारांची मालमत्ता होती. वारसाने मिळालेल्या जमिनी, पेट्रोल पंप आदींच्या किंमतीत वाढ झाल्याने त्यांचे मूल्य १३ कोटी २८ लाखांवर पोहोचले आहे. बँकांमध्ये त्यांनी १५ लाखांची गुंतवणूक केली आहे. बुलेट, टॅक्टर, ॲक्टिव्हा, स्कॉर्पिओ, होंडा सिटी, इनोव्हा अशा सहा गाड्या त्यांच्याकडे आहेत. वाजे यांच्याकडे आठ ग्रॅम (५७ हजार रुपये) तर पत्नीकडे २२५ ग्रॅम (१६ लाख २० हजार रुपये) सोन्याचे दागिने आहेत. वाजे यांच्याविरुध्द कुठलाही गुन्हा दाखल नाही. अथवा खटलाही प्रलंबित नाही.