लोकसत्ता वृत्तविभाग

देवळा : शहरासह तालुक्यात झपाटय़ाने वाढत असलेला करोना संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण तालुक्यात बुधवारपासून जनता संचारबंदी लागू करण्यात आली असून मंगळवापर्यंत ही संचारबंदी कायम राहणार आहे. प्रारंभीचे दोन दिवस संचारबंदीला दुकानदार, व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांकडून उत्स्फू र्त प्रतिसाद मिळाला आहे.

तालुक्यात सातत्याने करोना रूग्णसंख्येत वाढ होत असून आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत करोनाची साखळी तोडण्याची गरज असून त्यासाठी सर्व व्यापाऱ्यांशी चर्चा करून सात दिवसांसाठी स्वयंस्फूर्तीने जनता संचारबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. के वळ शहरच नव्हे, तर संपूर्ण तालुक्यात जनता संचारबंदी  लागू करावी, अशी मागणी करण्यात आल्याने ३०सप्टेंबरपासून संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती केदा आहेर यांनी दिली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे, उमराणे बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे, उपनगराध्यक्ष अतुल पवार, गटनेते अशोक आहेर, जितेंद्र आहेर आदींसह शहरातील  सर्व व्यापारी बांधव उपस्थित होते. संचारबंदीच्या पहिल्या दोन दिवशी जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून अजून पाच दिवस ही संचारबंदी राहणार आहे. दरम्यान, देवळा नगरपंचायतीने प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक पाऊल उचलले असून शहरात मुखपट्टीविना फिरणाऱ्यांना ५०० रूपये दंड  के ला जाणार आहे. तसेच संचारबंदी काळात शहरातील व्यापारी त्यांच्या दुकानातून ग्राहकांना सामानाची विक्री करतांना आढळून आल्यास व्यापाऱ्यास पाच हजार रूपये दंड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

६८ रुग्णांची नव्याने भर

देवळा शहर आणि तालुक्यात तपासणी के लेल्या संशयित रूग्णांचे १३४ अहवाल गुरूवारी प्राप्त झाले. त्यापैकी ६८ अहवाल सकारात्मक आले असून त्यात ४२ अहवाल हे देवळा शहर उपनगरांमधील आहेत.  २५ अहवाल हे तालुक्यातील विविध गावांमधील असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी दिली.

Story img Loader