घोटी – इगतपुरी तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या घोटी येथे रविवारी पहाटे दरोडेखोरांनी दोन ठिकाणी सशस्त्र दरोडा घातला. यावेळी घरातील महिला आणि लहान मुलांच्या कानातील सोन्याचे दागिने अक्षरशः ओरबाडून घेतले. प्रतिकार करणाऱ्या एकावर दरोडेखोरांनी तलवारीने वार केले. त्यांच्या हल्ल्यात पाच जण जखमी झाले. या घटनाक्रमाने घोटी हादरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>दत्तक नाशिक परत करा ; मनसेचे संदीप देशपांडे यांची मागणी

घोटी शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील भदे मळ्यात हा प्रकार घडला. येथे राहणारे श्रीकांत भदे यांच्या घरात पहाटे तीनच्या सुमारास चार ते पाच सशस्त्र दरोडेखोरांनी दरवाजाचा कडी कोयंडा तोडत प्रवेश केला. यावेळी त्यांनी घरातील काही जणांना मारहाण केली. महिला, मुलींच्या अंगावरील, कानातील दागिने ओरबाडून घेतले. घरातून सोन्याचे दागिने, ८० हजार रुपयांची रोकड, दोन भ्रमणध्वनी असा सुमारे दोन लाखहून अधिक किंमतीचा ऐवज घेऊन दरोडेखोरांनी पलायन केले. त्यांच्या मारहाणीत अलका भदे, जयवंत भदे, श्रीकांत भदे जखमी झाले. दरोडेखोरांनी याच परिसरातील आणखी एका घरावर दरोडा टाकला. तलवारीने वार करीत जावेदभाई गनी खान यांना जखमी केले. गनी खान यांच्या घराचा दरवाजा तोडून दरोडेखोरांनी चाकू, तलवारीचा धाक दाखवत सोन्याचे दागिने, भ्रमणध्वनी असा एक लाख ३२ हजाराचा ऐवज चोरून नेला.

हेही वाचा >>>मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचं षडयंत्र; आ. एकनाथ खडसेंचा आरोप

ऐन दिवाळीत दरोड्याच्या घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. हाताचे ठसे घेणारे तज्ज्ञ व श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. या घटनेतील जखमींवर घोटी व नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, उपअधीक्षक अर्जुन भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी भेट दिली. उपअधीक्षक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five people injured in attack by robbers in ghoti amy