धुळे – मध्यप्रदेशातून गावठी बंदुकींसह काडतुसांची शिरपूरमार्गे वाहतूक करणाऱ्या नाशिकच्या पाच तरुणांसह सहा जणांना शिरपूर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन लाख ६६ हजार रुपयांच्या बंदुका, जीवंत काडतुसे आणि पाच लाख रुपयांची मोटार जप्त करण्यात आली. हे पाच तरुण मोठा गुन्हा करण्याच्या उद्देशाने ही शस्त्रास्त्रे नाशिकला घेऊन जात होते का? याचा शोध पोलीस घेत आहेत.
अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली. मध्यप्रदेशातील सत्रासेन गावाकडून भोईटेमार्ग शिरपूरकडे काही तरुण मोटारीमधून गावठी बंदुकींसह जात असल्याची माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळाली. त्यानुसार पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुरेश शिरसाठ, उपनिरीक्षक संदीप पाटील, हवालदार संजय सूर्यवंशी, संतोष पाटील, मुकेश पावरा, योगेश मोरे, इसरार फारुक यांच्या पथकाने भोईटे गावाजवळ नाकाबंदी केली. संशयित मोटार आल्यावर तिला अडविण्यात आले. त्यातील संशयितांना ताब्यात घेत चौकशी केली असता, त्यांनी त्यांची नावे मोहितराम तेजवाणी (२१), आकाश जाधव (२४), राज मंदोरिया (२१), अजय बोरीस (२९), श्रीनिवास कानडे (२४) सर्व रा.नाशिक आणि दर्शन सिंधी (२१, रा.होळनांथे, शिरपूर) अशी सांगितली.
पोलिसांनी मोटारीची तपासणी केली असता आसनाखाली ७५ हजार रुपयांच्या तीन बंदुका, पाच हजार रुपयांची मॅग्झीन, सहा हजार रुपयांचे सहा जीवंत काडतूस, एक लाख ८० हजार रुपयांचे सात भ्रमणध्वनी आणि पाच लाख रुपयांची मोटार, असा एकूण सात लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे