लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: शेतमालाच्या व्यवहारात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला विधानसभा वा लोकसभा निवडणुकीपेक्षा अधिक महत्व आल्याचे प्रतित होत आहे. निवडणुकीपूर्वी मतदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्याचे सुख मिळाले. या मतदारांनी प्रथमच पंचतारांकित हॉटेल पाहिले. बस तसेच मोटारीतून त्यांना मतदान केंद्रावर नेण्यात आले. या प्रकारावर विरोधी गटाने आक्षेप घेतला असून या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली जाणार असल्याचे म्हटले आहे.
जिल्ह्यातील १३ बाजार समित्यांची निवडणूक वेगवेगळ्या कारणांनी गाजत आहे. त्यात हाणामारीपासून मतदारांना प्रलोभन दाखविण्यापर्यंत सर्व काही घडले. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत माजी खासदार देविदास पिंगळे आणि त्यांचे कट्टर विरोधक शिवाजी चुंबळे यांच्या पॅनलमध्ये सरळ लढत आहे. परस्परांना शह देण्यासाठी दोन्ही पॅनलने कुठलीही कसर सोडलेली नाही. बाजार समितीवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्व मार्गांचा अवलंब करण्यात आला. या निवडणुकीसाठी शुक्रवारी १३ केंद्रांवर मतदान झाले. त्यात गिरणारे, पाथर्डी गाव, सिन्नरफाटा, पेठ, जागमोडी, त्र्यंबकेश्वर, ठाणापाडा यांचा समावेश आहे. मतदानाच्या एक-दोन दिवस आधीच शेकडो मतदार अंतर्धान पावले होते. त्यांना शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. मतदानाच्या दिवशीच त्यांचे दर्शन घडले.
आणखी वाचा- नाशिक: दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; सर्वच समित्यांमध्ये चुरस
शुक्रवारी चार बस, १० ते १२ मोटारी व एक मिनिबस या वाहनांमधून या मतदारांना थेट मतदान केंद्रावर नेण्यात आले. महत्वाची बाब म्हणजे यात दोन शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसचा समावेश होता. इतकेच नव्हे तर, हॉटेलमधून मोटारींचा ताफा मार्गस्थ होताना पोलिसही उपस्थित असल्याचे सांगितले जाते. या प्रकारावर बाजार समितीचे माजी सभापती देविदास पिंगळे यांनी आक्षेप घेतला. बाजार समितीत कुठलेही काम न करता संबंधितांनी भ्रष्टाचार केला. त्यातून मतदारांना हॉटेलमध्ये ठेवणे आणि वाहनांमधून मतदानासाठी घेऊन जाणे शक्य झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. या संदर्भात निवडणूक यंत्रणेकडे आमच्या पॅनलतर्फे लेखी तक्रार केली जाणार असल्याचे पिंगळे यांनी सांगितले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण मतदारांना पंचतारांकित हॉटेलची सफर घडली.
दुसरीकडे, रविवारी मतदान असलेल्या मनमाड बाजार समितीतील मतदार इगतपुरीतील अलिशान रिसॉर्टमध्ये पाहुणचार झोडत असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या वाहतुकीसाठी बसची व्यवस्था केल्याची चर्चा आहे. एकाच वेळी हे मतदार मतदानासाठी येणार असल्याने मनमाडमध्ये केंद्राची निवड वाहनतळाची गरज लक्षात घेऊन करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.