नंदुरबार : नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात मंगळवारी दुपारी चार मालमोटारी आणि बस अशा पाच वाहनांचा अपघात होऊन दोन मालमोटार चालक त्यांच्या कक्षातच अडकले असून एकाचा मृत्यू झाला आहे. गुजरात राज्यातील सुरत-अमळनेर बसमधील १० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोंडाईबारी घाटात एक मालमोटार आणि दोन तेल टँकरचा अपघात झाला होता. तेलाचे टँकर रस्त्यावर उलटल्यामुळे संपूर्ण तेल महामार्गावर पडल्याने अनेक वाहने घसरून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. राष्ट्रीय महामार्ग पोलीस मदत केंद्राचे कार्यालय जवळच आहे. संबंधित विभाग आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी ठोस उपाययोजना न केल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जाते. घाटात चार मालमोटारींच्या विचित्र अपघातामुळे वाहनांचे आणि मुद्देमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हेही वाचा…नाशिक गारठले – तापमान १०.८ अंशावर – हंगामातील सर्वात कमी पातळी
मालमोटार चालक, सहचालक त्यांच्या कक्षातच अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न होत आहेत. गुजरातची बस अपघातग्रस्त झाल्याने जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोंडाईबारी घाटातील अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. महामार्ग पोलिसांनी पर्यायी रस्त्याने वळवून वाहतूक सुरळीत केली.