लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: मस्ती करतो म्हणून संभाजीनगर येथील पाच वर्षाच्या बालकास गरम तव्याचे चटके देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आगर टाकळी येथे घडला. स्थानिकांनी तक्रार केल्यामुळे या मुलाची सुटका करण्यात आली. या प्रकरणी संशयित काका-मावशीला पोलिसांनी ताब्यात घेतले.
याबाबत चाईल्डलाईनच्या निरीक्षक सायली चौधरी यांनी तक्रार दिली. विजय आणि आरती सदावर्ते (समतानगर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित काका-मावशीचे नाव आहे. संभाजीनगर येथील मुलगा चार महिन्यांपासून काका-मावशीकडे वास्तव्यास आहे. आई-वडिलांच्या ताब्यातून सांभाळण्यासाठी आणलेल्या या मुलाचा संशयितांकडून नेहमीच छळ केला जात होता. आसपासच्या रहिवाश्यांना हे लक्षात आले होते. या दाम्पत्याने गरम तव्याचे चटके दिल्याने स्थानिक नागरिकांनी धाव घेतली.
आणखी वाचा-नाशिक: दूधवाढीसाठी जनावरांना प्रतिबंधित औषधांची मात्रा, मालकाविरोधात गुन्हा
पोलीस आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला. संशयित दाम्पत्याने दुपारच्या सुमारास मुलगा मस्ती करतो म्हणून त्याला बेदम मारहाण केली. गरम तव्याने मुलाच्या उघड्या अंगावर चटके दिले. मुलाचा आवाज ऐकून नागरिकांनी धाव घेतली. या घटनेची माहिती समजल्यानंतर उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय पगारे तसेच चाईल्डलाईनच्या निरीक्षक सायली चौधरी यांच्या पथकाने धाव घेत मुलाची सुटका केली. संशयित दाम्पत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.