जळगाव शहराची दोन वर्षांपासून बंद असलेली विमानसेवा फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू होणार आहे. पुणे, मुंबई, इंदूर व अहमदाबाद या चार शहरांसाठी स्टार एअरवेज कंपनीच्या माध्यमातून विमानसेवा सुरू होणार आहे. तसेच जळगाव स्थानकात पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना थांबे देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
हेही वाचा- जळगाव पालिका महासभेत गदारोळानंतर कामकाज
जळगावातील उद्योजक आणि व्यापाऱ्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची जानेवारीत घेण्यात येणाऱ्या विकास परिषदेसाठी पूर्वतयारी बैठक झाली. यानिमित्ताने ललित गांधी यांनी जिल्ह्यातील उद्योजक, व्यावसायिक, शेतकरी प्रतिनिधींची त्यांनी बैठक घेतली. तत्पूर्वी शहरातील मायादेवीनगर भागातील रोटरी भवनात सायंकाळी गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी महिला उद्योजकता समितीच्या अध्यक्षा संगीता पाटील, समितीचे सदस्य दिलीप गांधी, नितीन इंगळे उपस्थित होते.
हेही वाचा- नाशिक: भाविकांसाठी मुखपट्टी बंधनकारक – त्र्यंबकेश्वर, सप्तश्रृंगी देवस्थानांचा निर्णय
पुण्याकडे जाण्यासाठी जळगाव येथे थांबा असणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे अन्य गाड्यांनाही थांबा मिळावा, यासाठी चेंबर्स ऑफ कॉमर्सने पाठपुरावा केला. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेण्यात आली. त्यांनी तत्त्वतः मान्यता दिली असून, त्यानुसार दुरांतो, गरीबरथ, दाणापूर-पुणे आणि हमसफर एक्स्प्रेस या रेल्वेगाड्यांना लवकरच जळगाव स्थानकात थांबा मिळणार असल्याचे गांधी यांनी सांगितले.