उड्डाणपूल भूमिपूजन सोहळ्यापासून दूर ठेवण्याचा डाव
शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्ग रुंदीकरणामुळे के. के. वाघ महाविद्यालयापासून आडगावपर्यंत ठिकठिकाणी निर्माण झालेल्या अपघातप्रवण क्षेत्रांवर उपाय म्हणून यादरम्यान उड्डाणपूल उभारण्यासह इतर ठिकाणीही आवश्यक त्या कामांचा भूमिपूजन सोहळा केंद्रीय भूपृष्ठ व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ५ नोव्हेंबर रोजी होत असताना या कामाच्या पाठपुराव्यावरून सत्ताधारी भाजपच्या तीनही आमदारांमध्ये आणि खासदार हेमंत गोडसे यांच्यामध्ये श्रेयवाद रंगला. या सर्व राजकीय मंडळींनी या कामासाठी भलेही केंद्र स्तरापर्यंत पाठपुरावा केला असेल, परंतु अपघातप्रवण चौफुलीवरील अपघातात एखाद्याचा बळी गेल्यावर घटनास्थळी संतप्त जमावास तोंड देण्यासाठी यापैकी एकही लोकप्रतिनिधी उपस्थित राहात नव्हता, ही दुखरी बाजूही अमृतधाम, रासबिहारी परिसरातील रहिवाशांनी यानिमित्त पुढे आणली आहे. परिसरातील चौफुल्यांवर होणाऱ्या अपघातांकडे लक्ष वेधण्यासाठी या भागातीलच सचिन अहिरे या सामान्य प्राध्यापकाने वारंवार केलेल्या आंदोलनांची आठवणही रहिवासी काढत असून उड्डाणपुलाच्या होणाऱ्या कामात त्यांचाही खारीचा वाटा असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
के. के. वाघ महाविद्यालयापासून जत्रा हॉटेलपर्यंत करण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाआधीच भाजपच्या तीनही आमदारांमध्ये अंतर्गत तसेच भाजप विरुद्ध शिवसेना खासदार अशी श्रेयवादाची लढाई सुरू झाली. त्यापैकी खासदार गोडसे आणि आमदार फरांदे यांनी एकमेकांना वेगवेगळ्या कामाचे श्रेय देत आपआपसातील वाद मिटविला असला तरी भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी तर थेट भाजपच्या बैठकीतच या कामासाठी आपण केलेल्या पाठपुराव्याचा उल्लेख करून आमदार फरांदेंसह उपस्थित सर्वानाच धक्का दिला. कारण सानप यांनी कोणत्या ‘गुप्त’ पद्धतीने या कामासाठी कधी, कुठे आणि कसा पाठपुरावा केला याची कुठेच वदंता नसल्याने सर्वच चकित झाले.
स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये श्रेयासाठी अशी चढाओढ सुरू असताना अगदी प्रारंभापासून म्हणजे महामार्गाचे रुंदीकरण झाल्यानंतर रासबिहारी चौफुलीवर पहिला अपघात झाल्यापासून भविष्यातील धोका ओळखून ज्यांनी वारंवार आंदोलन केले त्या प्रा. सचिन अहिरे यांचा लोकप्रतिनिधींना विसर पडला आहे. भूमिपूजन सोहळ्यासाठी त्यांना साधे निमंत्रणही देण्यात आलेले नाही.
महामार्ग रुंदीकरणाप्रसंगी मार्गाच्या दुतर्फा असलेल्या नववसाहतींचा कोणताही विचार करण्यात न आल्याने के. के. वाघ महाविद्यालयापासून आडगावपर्यंत ठिकठिकाणी महामार्गावर निर्माण झालेल्या चौफुल्या अपघातांची ठिकाणे बनली. जत्रा हॉटेल, रासबिहारी, अमृतधाम आणि के. के. वाघ महाविद्यालय या ठिकाणी झालेल्या या चौफुल्यांनी आजपर्यंत शेकडोंचा बळी घेतला. त्यामुळे अनेक संसार उजाड झाले. अपघातांमध्ये जखमी होऊन कित्येक जण कायमचे अंथरुणाला खिळले. अपघात झाल्यानंतर परिसरातील रहिवाशांनी रस्त्यावर उतरणे, आंदोलन करणे हे नेहमीचेच झाले. अपघातानंतर संतप्त जमावाचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी लोकप्रतिनिधी घटनास्थळी फिरकतही नसत. त्यात आज श्रेयवादाचा डंका पिटणाऱ्या मंडळींचाही समावेश आहे. अशा वेळी जमावाला शांत करण्यासाठी पुढाकार घेतानाच या प्रश्नाची दाहकता वेगवेगळ्या माध्यमांद्वारे पुढे आणण्याचा प्रयत्न प्रा. अहिरे यांनी केला.
प्रसंगी घराकडे दुर्लक्ष करून समाजसेवेकडे लक्ष देण्याच्या अहिरे यांच्या स्वभावाची काही जणांकडून खिल्लीही उडविण्याचा प्रयत्न झाला, परंतु आपल्यासोबत जे येतील त्यांच्यासह अहिरे हे रासबिहारी, अमृतधाम आणि के. के. वाघ चौफुल्यांवर उड्डाणपूल अथवा भुयारी मार्ग करण्याचा विषय कायम मांडत राहिले. त्यासाठी त्यांनी परिसरात अनेकदा स्वखर्चाने पत्रक वाटप करून विषयाची गंभीरता रहिवाशांना पटवून दिली. ५ जानेवारी २०१४, १ मे १४ रोजी अनुक्रमे बळी मंदिर आणि रासबिहारी चौफुली, ११ सप्टेंबर १५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, १ ते ९ एप्रिलदरम्यान दिल्ली येथे जंतरमंतर, १६ सप्टेंबर १६ रोजी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर याप्रमाणे त्यांनी उपोषण केले. कधी रासबिहारी चौफुलीच्या ठिकाणी उपोषण, तर कधी थेट दिल्ली येथे जंतरमंतरवर लढा दिला. महामार्गाचे रुंदीकरण झाल्यापासून के. के. वाघ महाविद्यालयापासून आडगावपर्यंत किती अपघात झाले, किती बळी गेले याची जंत्री पोलीस ठाण्यातून जमा करण्यासाठीही त्यांना बराच वेळ द्यावा लागला. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी भल्यामोठय़ा फलकांवर हजारो रुपयांचा खर्च करणाऱ्या स्थानिक नगरसेवकांनी कधी या पद्धतीने हा विषय मांडण्याचा प्रयत्न केल्याचे परिसरातील रहिवाशांना आठवत नाही. अशा या एकांडय़ा शिलेदाराच्या लढय़ास यश येत असताना राजकारणी मंडळींकडून जाणीवपूर्वक त्यांना बाजूला ठेवण्यात येत असल्याबद्दल परिसरातील रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
साधे निमंत्रणही नाही
रासबिहारी चौफुली आणि अमृतधाम चौफुलीवर उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला. आता उड्डाणपुलाचे भूमिपूजन होत असताना कार्यक्रमाचे साधे निमंत्रणही नाही. उड्डाणपूल होण्यासाठी कागदपत्रे जेव्हा सत्ताधारी भाजपच्या एका आमदाराकडे घेऊन गेलो होतो, तेव्हा त्यांनी ती भिरकावत हे शक्य नाही, हा वेडेपणा असल्याचे म्हटले होते. तेच आमदार आज या कामाचे श्रेय घेत आहेत. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. अर्थात, परिसरातील नागरिकांना सर्वकाही माहीत आहे.
–प्रा. सचिन अहिरे (सामाजिक कार्यकर्ते, पंचवटी)