जळगाव – जिल्ह्यातील मोह फुलांच्या उत्पादन प्रक्रियेत सुधारणा, विपणन धोरण आणि नवीन संधींविषयी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. प्रक्रिया केंद्र आणि विक्री व्यवस्थापन, या विषयाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.बैठकीला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक विठ्ठल भुकन यांची विशेष उपस्थिती होती. जळगाव जिल्ह्यातील मोह फुलांचे उत्पादन करणाऱ्या उत्पादकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानावर भर देऊन प्रक्रिया उद्योग वाढविणे तसेच स्थानिक बाजारपेठ निर्माण करण्यावर यापुढील काळात भर देण्यात येणार आहे.
मोह फुलांच्या उत्पादनातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासह आदिवासी शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न आणि पारंपरिक वन संपत्तीचा शाश्वत विकास, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.मोह वृक्ष हा ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. मोह वृक्ष आदिवासी समाजासाठी जीवनदायी समजला जातो. मोह फुलांपासून वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार करण्यात येतात. आदिवासी मोह फुलांचा वापर सण-समारंभापासून लग्नापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीत करतात. वसंत ऋतू येताच मोहाच्या झाडाची पानझड सुरू होते. काही दिवसांनी मोहाची फुले येतात, जी रात्रभर खाली पडत राहतात. मोहाच्या फुलांचा वैशिष्ट्यपूर्ण सुगंध सगळीकडे दरवळत राहतो. जळगाव जिल्ह्याप्रमाणेच नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण या तालुक्यांमध्ये रस्त्यांच्या कडेला मोह वृक्ष अधिक प्रमाणावर आहेत. मोह फुलांपासून केवळ मद्यच तयार करता येते असा बहुतेकांचा समज आहे.
परंतु, आता त्यापासून लाडू, बिस्कीट, तेल, कपडे धुण्याचे साबण, मेणबत्ती, अशा विविध प्रकारच्या वस्तू तयार करता येतात. त्यामुळे आदिवासींना आर्थिक उत्पन्नाचा नवा स्त्रोत उपलब्ध झाला आहे. परंतु, या वस्तुंच्या विपणनात आदिवासी कमी पडतात. मोहफुलांमध्ये प्रथिने, खनिजे, कर्बोदके, कॅल्शियम, लोहतत्त्वे मोठ्या प्रमाणात असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. मोहाच्या बियांपासून निघणारे तेल फुलांइतकेच उपयोगी असते. याकारणाने मोहाच्या फुलांना व बियांना बाजारात चांगली मागणी असते. त्यामुळेच मोह फुलांच्या उत्पादन प्रक्रियेत सुधारणा करण्याची गरज आहे. विपणन धोरण आणि नवीन संधींविषयी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली.