जिल्ह्य़ात पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याची स्थिती बिकट असल्याने हा प्रश्न पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. देवळा तालुक्यातील टंचाई आढावा बैठकीतही हा प्रश्न गाजला. टंचाईचा प्रश्न पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ात चार टंचाईचेही संकट उभे ठाकले असून प्रशासनाने जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी आणि अन्य काही घटकांशी चर्चा करत चाराटंचाईविषयी माहिती संकलनाचे काम सुरू केले असून गुरुवारी या संदर्भात बैठक झाल्यानंतर या विषयीचे चित्र अधिक स्पष्ट होईल. सद्यस्थितीत सप्टेंबर अखेपर्यंत पुरू शकेल, इतकाच चारा शिल्लक असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मागील काही वर्षांमध्ये अवकाळी पाऊस तसेच वातावरणातील बदलांमुळे शेतीशी संबंधित सर्व ठोकताळे चुकत आहेत. ऑगस्ट अखेरीस पाऊस पूर्णपणे गायब झाल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. यामुळे मका, गहू, ऊस यासह अन्य काही पिके उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. शेतकरी यातीलच काही मालासह घास, कडब्याचा उपयोग चारा म्हणून जनावरांसाठी करण्यात येतो. मात्र पाऊस नसल्याने चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. जिल्ह्य़ात लहान-मोठय़ा जनावरांची संख्या १२,३७,३१३ इतकी आहे. त्यांना प्रतिमाह साधारणत २०२७७४ मेट्रिक टन चारा आवश्यक आहे. खरीप आणि रब्बी हंगामाचा विचार केला तर वर्षभरात ३४१४१६४ मे. टन चारा निर्माण झाला. मात्र पाऊस नसल्याने ऑगस्टअखेर पर्यंत केवळ १४१९४१८ मे.टन चारा शिल्लक आहे. हा उपलब्ध साठा ऑक्टोबरअखेपर्यंत पुरेल असा अंदाज जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून व्यक्त होत आहे. प्रत्यक्षात मात्र सिन्नर, निफाड यासह अन्य ठिकाणी चाराटंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे. टंचाई शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चाराटंचाईबाबत संबंधित विभागाकडून अहवाल मागविण्यात येत असून गुरुवारी या विषयावर वरिष्ठांसोबत बैठक असल्याची माहिती दिली. दुसरीकडे, चारा अभावी दुधाच्या दरातही वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. साधारणत सहा महिन्यापूर्वी ३०- ४० रुपये लिटरने मिळणाऱ्या दुधाने सप्टेंबरमध्ये ५० चा टप्पा पार केला आहे. काही महिन्यापूर्वी दुभत्या जनावरांसाठी १८०० रुपये मे.टन दराने चारा विकला जात होता आता त्याची किंमत २४०० रुपये इतकी झाल्याने दुधाच्या दराविषयी विचार करावा लागत असल्याचे दूध विक्रेते शिवाजी आव्हाड यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा