नाशिक – सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे पिण्याच्या पाण्यासह पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता करण्याची सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी केली. मौजे पांगरी येथील शेतकरी जनावरांना चारा व पाणी मिळावे ही मागणी घेऊन पांगरी येथे आमरण उपोषणाला बसले होते. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर २५ सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांनी उपोषण स्थगित केले होते. भुसे यांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली.
पांगरी गावात १९९६ मोठी जनावरे आणि ४४० लहान जनावरे अशी एकूण २४३६ जनावरे आहेत. मोठ्या जनावरांसाठी १८ किलो प्रतिदिन प्रति जनावर आणि लहान जनावरांसाठी नऊ किलो प्रतिदिन प्रति जनावर या दराने ११९७ मेट्रिक टन हिरवा चारा एक महिन्यासाठी आवश्यक आहे. मोठ्या जनावरांसाठी वाळलेला चारा सहा किलो प्रतिदिन प्रति जनावर व लहान जनावरांसाठी तीन किलो प्रतिदिन या निकषानुसार ३९९ मेट्रिक टन चारा एक महिन्यासाठी आवश्यक असल्याची बाब प्रशासनाकडून मांडण्यात आली. अन्यत्र जिथे चाऱ्याची उपलब्धता आहे, तेथील चारा सिन्नर व पांगरी येथे देण्याचे नियोजन करावे, असे भुसे यांनी सूचित केले.
हेही वाचा – लासलगाव बाजारात सकाळीच ४०० वाहने दाखल, नाशिक जिल्ह्यात कांदा लिलावास सुरुवात
हेही वाचा – गॅस गळती हे नाशिकमधील त्या स्फोटाचे कारण, तपास यंत्रणेचा निष्कर्ष
अपारंपरिक चारा पिके योग्य त्या प्रमाणात जनावरांना खाद्य म्हणून देता येईल. वन विभागाच्या क्षेत्रावर लागवड केलेला चारा व गवत लागवडीच्या तीन वर्षांनंतर चारा म्हणून वापरता येऊ शकते. पण सिन्नर तालुक्यात १३० हेक्टर क्षेत्रावरील गवत पहिल्या वर्षात असून १८५ हेक्टरवरील गवत हे दुसऱ्या वर्षातील आहे. गावालगतच्या पाच वस्त्यांसाठी दोन टँकरच्या खेपा मंजूर करण्यात आल्या आहेत. भोजापूर धरणाचे पाणी सद्यस्थितीत मानोरीपर्यंत सोडण्यात आले आहे. येवा कमी असल्याने पुढील गावापर्यंत पाणी पोहोचण्यास वेळ लागत असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांसह जनावरांसाठी पाण्याचे टँकर सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. सध्या सिन्नर तालुक्यात एक गाव व ११ वाड्यांसाठी १६ खेपा मंजूर आहेत.