नाशिक: उष्णतेच्या लाटेत जिल्ह्यात सर्वत्र पाणी टंचाईच्या झळा बसत असताना काही भागात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. नाशिक आणि सिन्नर तालुक्यात चारा टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. या दोन्ही तालुक्यात मे महिनाभर पुरेल इतकाच चारा असल्याने पशुधनासाठी बाहेरून चाऱ्याची व्यवस्था करावी लागणार आहे. मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाल्यास चाऱ्याचे उंचावलेले दरही कमी होतील, अशी अपेक्षा आहे.
प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त कार्यालयाच्या अहवालानुसार पशु धनासाठी सात तालुक्यांत जूनअखेरपर्यंत तर, प्रत्येकी एका तालुक्यात जुलै व ऑगस्टपर्यंत आणि दोन तालुक्यांत सप्टेंबरपर्यंत चारा पुरेल, अशी स्थिती आहे. या वर्षी पाणी टंचाईचे संकट सर्वत्र भेडसावत आहे. नाशिक व सिन्नर या तालुक्यात जोडीला चारा टंचाईचा प्रश्न उभा राहिला आहे. नाशिक जिल्ह्यात लहान-मोठे एकूण ५८ हजार ४६६ तर सिन्नर तालुक्यात एक लाख ७९ हजार १८३ इतके पशूधन आहे. नाशिक तालुक्यात चारा उपलब्धतेते फारसे स्त्रोत नाहीत. त्यामुळे या भागास एरवी बाहेरील चाऱ्यावर अवलंबून राहावे लागते.
हेही वाचा : धरणातील पाण्यात उतरताना खबरदारी घ्या…नाशिक जिल्ह्यात आठवडाभरात १० जणांचा मृत्यू
सिन्नर तालुक्यात चारा टंचाईमुळे काही पशुपालकांना जिथे चाऱ्याची व्यवस्था होईल, तिथे स्थलांतरीत करावे लागत आहे. मे महिन्याच्या अखेरीस मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यास नैसर्गिकरित्या चारा उपलब्ध होईल, अशी या विभागाला आशा आहे. १० जूनपर्यंत पाऊस न झाल्यास पशू संवर्धन विभागाकडून टंचाई भासणाऱ्या भागात चाऱ्याचे नियोजन केले जाणार असल्याचे सांगितले जाते. जिल्ह्यातील चारा शेजारील जिल्ह्यात नेण्यास प्रतिबंध आहे. चाऱ्याचे दरही सध्या गगनाला भिडल्याचे पशूपालक सांगतात. जिल्ह्याच्या हद्दीत उत्पादित होणारा चारा इतर जिल्ह्यांमध्ये नेण्यास प्रतिबंध आहे.
पशूधन, चाऱ्याची गरज कशी ?
जिल्ह्यात दोन लाख २२ हजार २६ लहान, आठ लाख ६६ हजार २८४ मोठी जनावरे तर आठ लाख ५२ हार ९५५ शेळ्या-मेंढ्या असे एकूण १९ लाख ४१ हजार २६५ पशूधन आहे. त्यांना दर महिन्याला साधारणत: एक लाख ८६ हजार १५० मेट्रिक टन चारा लागतो. तर महिन्याकाठी तीन कोटी ६० लाख ८८ हजार चारा लिटर त्यांची पाण्याची गरज आहे.
हेही वाचा : नाशिक विभागातील मान्सूनपूर्व तयारीचा आज मुख्यमंत्र्यांकडून आढावा
तालुकानिहाय चारा स्थिती
जिल्ह्यात मालेगाव, कळवण, नांदगाव, त्र्यंबकेश्वर, निफाड, येवला व चांदवड या तालुक्यात जूनअखेरपर्यंत चाऱ्याची उपलब्धता आहे. पेठमध्ये जुलैअखेरपर्यंत, बागलाण व इगतपुरी ऑगस्ट तर देवळा, सुरगाणा, दिंडोरी तालुक्यात सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत चारा पुरेल अशी स्थिती असल्याचे अहवालात म्हटले आहे. नाशिक व सिन्नर चाऱ्याची स्थिती चिंताजनक आहे. या दोन्ही ठिकाणी मेपर्यंत पुरेल इतकाच चारा आहे.