नाशिक : प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अंबड आणि सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा पायी मोर्चा गुरूवारी मुंबईकडे रवाना झाला. मोर्चेकरी राज्यपालांची भेट घेणार आहेत. अंबड आणि सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकरी मुंबईकडे रवाना झाले. अंबड, सातपूर येथील सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची सुमारे ११०० हेक्टर इतकी जमीन १९७३ मध्ये बळजबरीने संपादित केली गेली. त्यावेळी अनेक आश्वासने शासनाने दिली होती.
एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. यामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अंबड ग्रामस्थांना कोणत्याही मूलभूत सुविधा न देता ग्रामस्थांची असलेली गायरान जमीन विनासंमती एमआयडीसीला देण्यात आली. ती गायरान जमीन घेण्यात येऊ नये अथवा मोठ्या उद्योगाला देण्यात यावी, औद्योगिक वसाहत महामंडळ व नाशिक महानगरपालिकेकडे अनेक वेळा तक्रारी करूनही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प न तयार केल्याने उरलेली जमीन नापीक झाली. त्यामुळे शेती होत नाही. प्रकल्प करण्यात यावा, एमआयडीसीतील अनेक पडीत भूखंडाचे छोटे छोटे तुकडे करून विकासक व गुंतवणूकदार यांना वाटप करण्यात येत असल्याने उद्योजकांना भूखंड मिळत नाहीत. अंबड, चुंचाळे येथे प्रचंड नागरी वस्ती वाढल्याने २० वर्षापासून मागणी असलेले नवीन स्वतंत्र पोलीस ठाणे मंजूर करण्यात यावे, औद्योगिक वसाहतीतील अनेक भूखंडावर बेकायदेशीर पोटभाडेकरू व बेकायदेशीर भूखंडाचा होणार वापर थांबविण्यात यावा, आदी मागण्यांसाठी हा मोर्चा आहे.
हेही वाचा…शहरात चार दिवसात नायलाॅन मांजाप्रकरणी ७१ गुन्हे
मोर्चात बंडू दातीर, माणिक दातीर, सुखदेव दातीर, गोरख दातीर, योगेश दातीर आदींसह शंभराहून अधिक शेतकरी सहभागी झाले. नेहमी मोर्चा नाशिकच्या वेशीवर अडवला जात असल्याने मोर्चेकऱ्यांनी विल्होळीच्या पुढून मुंबईच्या दिशेने कूच केले. मोर्चाचा पहिला मुक्काम गुरूवारी घोटीच्या आसपास राहणार असून शुक्रवारी कसारा (खर्डी), शनिवारी शहापूर, रविवारी पडघा मानकोळी, २० रोजी मानकोळी कल्याण बायपास, २१ रोजी ठाणे आणि २२ रोजी मुलूंड असा हा मोर्चा थांबणार आहे. सोमवारी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांची भेट घेण्यात येणार असून निवेदन दिल्यानंतर ते शेवटच्या दिवशी आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगितले .