नाशिक: शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्राजवळील जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाल्यामुळे सातपूर आणि नाशिक पश्चिम विभागातील सहा प्रभागात बुधवारी सकाळपासून पाणी पुरवठा बंद करावा लागला. जल वाहिनीच्या दुरुस्तीसाठी गुरुवारी देखील पाणी पुरवठा बंद ठेवावा लागणार असून थेट शुक्रवारी सकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. ऐन सणोत्सवात उपरोक्त प्रभागात पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दीपोत्सव साजरा करण्यासाठी अवघे शहर सज्ज होत असताना या काळात महानगरपालिकेने सेवा सुविधा सुरळीत राखण्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्याची गरज मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी विभागप्रमुख, खातेप्रमुखांच्या बैठकीत मांडली होती. यात पाणी पुरवठा सुरळीत राखण्याचाही समावेश होता. या कामात कसूर झाल्यास संबंधित विभागाला जबाबदार धरण्याची तंबी त्यांनी दिली होती. असे असताना ऐन दिवाळीत शहरातील सहा प्रभागात पाणी पुरवठा ठप्प झाल्याची स्थिती आहे.

हेही वाचा… नाशिक : एमबीबीएसच्या परीक्षेत गोंधळ – आरोग्य विद्यापीठावर प्रश्नपत्रिका बदलण्याची वेळ

सातपूर विभागातील शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रालगतच्या १३०० मिलीमीटर व्यासाच्या वाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने ही स्थिती निर्माण झाली. त्यामुळे प्रभाग क्रमांक आठ, नऊचा काही भाग, प्रभाग क्रमांक १०, प्रभाग क्रमांक ११ चा काही भाग तसेच नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक सात आणि १२ मधील पाणी पुरवठा विस्कळीत झाला. गळतीमुळे बुधवारी सकाळी १० पासून पाणी पुरवठा नाईलाजास्तव बंद करावा लागला असुन दुरुस्तीचे काम युध्द पातळीवर सुरु करण्यात आल्याचे पाणी पुरवठा विभागाने म्हटले आहे. जल वाहिनीच्या दुरुस्तीचे काम सायंकाळी उशिरापर्यंत झाले नाही. गुरुवारीही हे काम चालू राहणार असल्याने या दिवशी पाणी पुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, नागरिकानी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. सणोत्सवाची लगबग सुरू असताना पाणी पुरवठा ठप्प झाल्यामुळे नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

पाणी पुरवठा बंद झालेला परिसर

सातपुर विभाग प्रभाग क्रमांक आठमधील बळवंतनगर जलकुंभ परिसर, सोमेश्वर कॉलनी ,सुवर्णकार नगर रामेश्वरनगर, बेंडकुळेनगर, पाटील पार्क परिसर, नवशा गणपती, आनंदवली, सावरकरनगर, पाईपलाईन रोड, काळेनगर, सदगुरुनगर, खांदवेनगर, गणेश कॉलनी, सुयोग कॉलनी, कामगारनगर, गुलमोहर विहार, विवेकानंदनगर, निर्मल कॉलनी, काळेनगर, शंकरनगर , चित्रांगण सोसायटी, मते नर्सरी रोड. प्रभाग क्रमांक नऊमधील ध्रृवनगर जलकुंभ परिसर, ध्रृव नगर, मोतीवाला कॉलेज, हनुमाननगर, संभाजीनगर ,शिवशक्ती कॉलनी, प्रभाग १० मधील अशोकनगर, जाधव संकुल, समृद्धीनगर, वास्तू नगर, विवेकानंद नगर, पिंपळगाव बहुला गावठाण, राज्य कर्मचारी सोसायटी परिसर, सात माऊली, संभाजीनगर, राधाकृष्ण नगर. प्रभाग क्रमांक ११ मधील प्रबुद्ध नगर व अन्य परिसर, नाशिक पश्चिम विभागात प्रभाग क्रमांक सातचा काही भाग. नहुष जलकुंभ, नरसिंहनगर, पूर्णवादनगर, अरिहंत रुग्णालय, दातेनगर, अयोध्या कॉलनी, तेजोप्रभा, आनंदनगर, डीकेनगर, शांती निकेतन सोसायटी, आयचितनगर, चैतन्यनगर, सहदेवनगर, पंपिंग स्टेशन, चव्हाण कॉलनी, श्रमिक कॉलनी, माणिकनगर, रामराज्य जलकुंभातून पाणी पुरवठा होणारा सावरकरनगर परिसर, दातेनगर, रामनगर, उदय कॉलनी, नेर्लीकर रुग्णालय, जेहान चौक, डिसुझा कॉलनी, शिवगिरी सोसायटी, कॉलेज रोड, एसटी कॉलनी, शहीद चौक परिसर आणि प्रभाग १२ मधील यशवंत कॉलनी, कल्पनानगर, कॉ्लेजरोड व परिसरात बुधवारपासून पाणी पुरवठा बंद झाला आहे. गुरुवारी या भागात पाणी पुरवठा होणार नाही.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: For the repair of massive leakage in the water channel water supply will have to be shut for two days in six wards of satpur and nashik west divisions dvr