नाशिक : शहरातील भ्रमणध्वनी साहित्य विक्री आणि दुरुस्तीच्या व्यवसायावर एकाधिकारशाही निर्माण करण्याच्या मुद्यावरून मराठी आणि अमराठी व्यावसायिकांमध्ये उद्भवलेल्या वादावर दुसऱ्या दिवशीही तोडगा निघाला नाही. अमराठी व्यावसायिकांनी आपली सर्व दुकाने बंद ठेवत दुरुस्तीचे काम करणाऱ्या मराठी व्यावसायिकांची कोंडी केल्याची तक्रार केली जात आहे. संबंधितांच्या भूमिकेमुळे भ्रमणध्वनी दुरुस्तीचे काम ठप्प झाले आहे. या विषयात मनसेने उडी घेतल्यानंतर अमराठी व्यावसायिकांनी राजस्थानमधील भाजपच्या एका खासदाराच्या मदतीने गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे दाद मागितल्याचे पत्र समाज माध्यमात प्रसारित झाले आहे. त्यात राजस्थानी व्यापाऱ्यांना नाशिकमध्ये त्रास दिला जात असल्याचा उल्लेख आहे. या पत्राची सत्यता स्पष्ट झाली नसली तरी संबंधितांनी ते समाज माध्यमात टाकल्याचे मराठी व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
शहरातील महात्मा गांधी रस्त्यावरील भ्रमणध्वनी साहित्य विक्रीत अमराठी व्यावसायिकांचे वर्चस्व आहे. परिसरातील बहुतांश दुकाने संबंधितांनी व्यापली आहेत. याच ठिकाणी मराठी युवक भ्रमणध्वनी दुरुस्तीचे काम करतात. अमराठी व्यावसायिकांनी साहित्य विक्रीबरोबर दुरुस्तीही सुरू केल्याने वादाला तोंड फुटले आहे. यातून सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे संबंधितांनी आपली दुकाने बंद ठेवली. परिणामी, दुरुस्तीचे काम करणाऱ्यांना साहित्य मिळाले नाही. दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य उपलब्ध नसल्याचे भ्रमणध्वनी दुरुस्तीचे काम ठप्प झाल्याचे विरेन सेल्युलरचे प्रसाद पवार यांनी सांगितले.
हेही वाचा…नाशिक : वणवे रोखण्यासाठी उपाययोजनांकडे दुर्लक्ष
भ्रमणध्वनी दुरुस्तीत अमराठी व्यावसायिकांनी शिरकाव केल्यामुळे अस्वस्थ मराठी व्यावसायिकांनी मनसेकडे दाद मागितली होती. त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बाजारपेठेवर अशाप्रकारे एकाधिकारशाही निर्माण करता येणार नसल्याचे ठणकावले. सुटे भाग विकणाऱ्यांनी दुरुस्तीचे काम करू नये, अशी मराठी व्यावसायिकांची भावना आहे. यासंदर्भात विचार केला जाईल, असे सांगून दोन दिवसांपासून अमराठी व्यावसायिक अंतर्धान पावले. बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद असल्याने दुरुस्तीचे काम करणाऱ्यांची कोंडी झाली आहे.
दरम्यान, राजस्थानच्या जालोर-सिरोहीचे खासदार देवजी पटेल यांचे पत्र संबंधितांकडून समाजमाध्यमात प्रसारित करण्यात आल्याकडे मराठी व्यावसायिक लक्ष वेधत आहेत. बाजारपेठेत अमराठी व्यावसायिकांची दादागिरी वाढत आहे. अनेकदा त्यांच्याकडून ग्राहकांना मारहाण केली जाते. दुकाने बंद ठेवून त्यांनी दुरुस्तीचे काम करणाऱ्या मराठी व्यावसायिकांविरुध्द असहकार्य पुकारल्याची तक्रार होत आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी तोडगा काढण्याऐवजी संबंधितांनी दुकाने बंद ठेवल्याचे नमूद केले. लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…शेततळ्यात बुडून भावंडांचा मृत्यू ; नाशिक जिल्ह्यातील घटना
अमित शहा यांच्याकडे तक्रार ?
राजस्थानी व्यावसायिकांना नाशिकमध्ये स्थानिकांकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार राजस्थानमधील खासदार देवजी पटेल यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केल्याचे पत्र समाज माध्यमात प्रसारित झाले आहे. अमराठी व्यावसायिकांनी पत्र प्रसारित केल्याचे मराठी व्यावसायिक सांगतात. त्यास अमराठी व्यावसायिकांनी दुजोरा दिला नाही. या पत्रात स्थानिक लोक राजस्थानी व्यावसायिकांना नाशिकमध्ये त्रास देऊन अवैध वसुली करतात. याबद्दल पोलिसांकडे तक्रार करूनही कारवाई केली जात नाही, यामुळे राजस्थानी व्यावसायिकांमध्ये अस्वस्थता असल्याचे पटेल यांनी म्हटले आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये आणि संबंधितांना शांततेत व्यवसाय करता यावा म्हणून उपरोक्त प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे.