लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक: नाशिक सहकारी साखर कारखाना रस्त्यावर दोन महिन्यांपासून बिबट्यांकडून पशुधनावर हल्ले होत असल्याने वनविभागाने परिसरात पिंजरा लावला. पळसे येथील गायखे मळ्यात कारखाना रस्त्यालगत लावलेल्या पिंजऱ्यात सोमवारी बिबट्या जेरबंद झाला.
आणखी वाचा-धुळे : धावत्या मालमोटारीला आग; चिकू, द्राक्षांचे नुकसान
कारखाना तसेच पळसे शिवारात रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना कायमच बिबट्याचा वावर दिसतो. त्यामुळे त्यांच्यात भीती असते. परिसरातील ससे, कुत्रे, वासरु, कोंबड्या आदींवर बिबट्याने हल्ला केल्याचे प्रकार घडल्याने शेतकऱ्यांच्या भीतीत अधिकच वाढ झाली. पशुधनही संकटात सापडले. परिसरात बिबट्याचा वाढलेला वावर पाहता परिसरात पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली. वनविभागाने त्यानुसार पिंजरा लावला. सोमवारी सकाळी या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली. बिबट्याला सुरक्षितरित्या पिंजऱ्यातून बाहेर काढत वनखात्याच्या वाहनातून नाशिक येथे नेण्यात आले.