जळगाव – यावल वनविभागातर्फे यावलमधील अवैध फर्निचर दुकानांवर धडक कारवाई करण्यात येऊन सुमारे एक लाख रुपये किंमतीचे वनलाकूड आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल वनविभागातर्फे यावल आणि किनगाव येथील अवैध फर्निचर दुकानांवर छापे टाकण्यात आले.
हेही वाचा >>> शिधापत्रिकेतील नाव कमी करायचे ? हजार रुपये द्या…बोदवड तहसील कार्यालयात लाच घेताना लिपिक जाळ्यात
यावल येथील शेख असलम यांच्या मालकीच्या मुन्शी फर्निचरमध्ये विनापरवाना सागाचे पाच नग, रंधा यंत्र, असा २१ हजार ९८४ रुपयांचा, तर किनगाव येथील रामचंद्र पाटील यांच्या मालकीच्या फर्निचर दुकानात आठ दरवाजा-फालके, दोन पलंग, सोफासेट, सागाचे ७२ नग, चार चौरंग, तसेच लाकूड कटर यंत्र, असा ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, डोंगरकठोरा व वाघझिरा येथील वनपालांकडून तपास केला जात आहे. दरम्यान, वनपरिक्षेत्र यावल पूर्व भागात जानोरी येथील सुकी धरणानजीक राखीव वनखंडात असलेल्या सात हेक्टर क्षेत्रातील अनधिकृत अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले. तेथे पुन्हा अतिक्रमण न होण्यासाठी यंत्राच्या सहाय्याने खोल सलग समतर चर खोदण्यात आले.