लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक: दीड महिन्यापूर्वी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपळद येथे बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला होता. या परिसरातील बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.
दीड महिन्यापूर्वी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपळद येथे देविका सकाळे (सात, सकाळे मळा) ही चिमुकली दळणाचा डब्बा घेऊन आपल्या घराकडे जात असतांना बिबट्याने झडप घालत तिला फरफटत नेले. या हल्लात देविकाचा मृत्यू झाला. या हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने केली जात होती.
हेही वाचा… जळगाव: हत्याकांडाने भुसावळ हादरले, रेल्वे कर्मचार्याकडून पत्नीसह आईची हत्या; शालक गंभीर
वन विभागाने ठिकठिकाणी १० हून अधिक पिंजरे लावले. अखेर एका पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. बिबट्याला पाहण्यासाठी स्थानिक गामस्थांनी गर्दी केली होती. त्यामुळे बिबट्याला सुरक्षितरित्या हलवण्यात अडचणी आल्या. जेरबंद बिबट्या मादी असून ती चार वर्षाची आहे, असे वन विभागाकडून सांगण्यात आले.