नाशिक : निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात वन विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या पक्षी गणनेत एकूण ११ हजार ७२५ पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यात ९९०४ पानपक्षी आणि झाडावरील, गवताळ भागातील १८२१ पक्ष्यांचा समावेश आहे.स्थलांतर करणारे पक्षी मार्च महिना उजाडला असतानाही अभयारण्यात पाहण्यास मिळत आहेत. अफगणिस्तान, हिमालयामधून येणारा रोझी पिपिट, चक्रवाक, अमेरिकेतून येणारा ओस्प्रे हे पक्षी अजूनही अभयारण्यात तळ ठोकून आहेत. हिमालय पार करून येणाऱ्या पट्टकादंब या पक्ष्याची जोडीही अभयारण्यात पाहण्यास मिळाली.

नांदुरमध्यमेश्वर गोदावरी नदीपात्र, कोठुरे, कुरुडगाव, काथरगांव यांसह एकूण सात ठिकाणी पक्षी गणना करण्यात आली. यामध्ये थापट्या, गार्गनी, मार्श हरियर, वेडा राघु तसेच स्थानिक पक्षी उघडया चोचीचा बगळा, जांभळा बगळा, राखी बगळा, स्पॉट बिल डक, स्पुनबिल, कमळपक्षी शेकाट्या, नदीसुरय, शंकर आदी पक्षी आढळून आले.

हिवाळ्यात नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात देशी-विदेशी पक्ष्यांचे आगमन होते. २८० पेक्षा अधिक जातीचे पक्षी या ठिकाणी बघावयास मिळतात. तसेच ४५ जातीचे मासे आणि ४०० पेक्षा जास्त वनस्पतीदेखील या अभयारण्यात आहेत. अभयारण्याच्या विविध पक्षी निरीक्षण मचाणींवरुन पक्षीमित्रांच्या सहकार्याने पक्षी गणना करण्यात आली. सहायक वनसंरक्षक हेमंत उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश पाटील, प्रभारी वनपाल संदीप काळे, वनरक्षक आशा वानखेडे, नेचर क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, गंगाधर आघाव, रोहित मोगल, विकास गारे. प्रमोद मोगल, गंगाधर आघाव, संजीव गायकवाड आदी पक्षी गणनेत सहभागी झाले होते

Story img Loader