लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक: अंजनेरी येथील प्रस्तावित रोप वे विषयाचा चेंडू गुरुवारी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविल्याने पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. पर्यावरणप्रेमींशी झालेली बैठक अवघ्या पाच मिनिटात वनमंत्र्यांनी आटोपती घेतल्याने या विषयी जनआंदोलन तीव्र करण्याचा इशारा पर्यावरणप्रेमींनी दिला आहे.
ब्रह्मगिरी ते अंजनेरी या ५.७ किलोमीटर लांबीच्या रोप वेसाठी खासदार हेमंत गोडसे आग्रही आहेत. दुसरीकडे, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील पर्यावरणवाद्यांचा या रोप वे प्रकल्पास विरोध आहे. अंजनेरी पर्वतावर गिधाडांचा अधिवास असून रोप वेमुळे गिधांडाचा अधिवास नष्ट होईल, या भीतीने प्रस्तावित रोप वे विरोधात अलिकडेच पर्यावरणप्रेमींकडून निदर्शने करण्यात आली. विशेष म्हणजे, या विरोधाकडे सर्वच राजकीय पक्षातील लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.
हेही वाचा… नवजात शिशुंची दूध पेढी कमी संकलनामुळे संकटात; जिल्हा रुग्णालयासमोर आव्हान
नाशिक, त्र्यंबकेश्वर येथील पर्यावरणप्रेमींनी गुरूवारी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. वनमंत्र्यांनी हा विषय स्थानिक पातळीवरचा असल्याचे सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत पर्यावरणप्रेमींशी चर्चा करण्यास तसेच बैठक बोलावून त्यांची भूमिका समजावून घेऊन याविषयी निर्णय घ्या, अशी सूचना केली. वनमंत्र्यांनी दाखविलेल्या असमर्थततेविषयी पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. वनविभागाचा विषय, वन्यजीवांचा अधिवास हा वनमंत्र्यांच्या अखत्यारित नव्हे तर, स्थानिक प्रशासनाच्या पातळीवर येतो, याविषयी आश्चर्य व्यक्त केले. रोप वेला असणारे अप्रत्यक्ष समर्थन पाहता लोकप्रतिनिधींना पर्यावरण संवर्धन तसेच जैवसंपदा या विषयी काही देणे घेणे नाही हे लक्षात येत असल्याचा आरोप करीत रोप वे होत असेल तर जनआंदोलन तीव्र करण्याचा इशारा पर्यावरणप्रेमींनी दिला.