नाशिक : पक्षाने संधी न दिल्यामुळे आता कुठल्याही परिस्थितीत थांबणार नाही, हरणार नाही. विधानसभा निवडणूक लढविणारच, असा निर्धार भाजपचे माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी व्यक्त केला. पाटील यांच्या बंंडखोरीमुळे नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपची डोकेदुखी वाढणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच इच्छुकांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी धडपड सुरू केली आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघातून यावेळी आमदार सीमा हिरे यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी दिनकर पाटील यांच्यासह इतर इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. दिनकर पाटील यांनी याआधीही विधानसभा निवडणूक तसेच लोकसभा निवडणुकीसाठीही उमेदवारीची तयारी केली होती. त्यावेळीही त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्धार केला होता. परंतु, पक्षश्रेष्ठींच्या मध्यस्थीनंतर ते शांत राहिले होते. यावेळी नाशिक पश्चिम मतदार संघातून उमेदवारीसाठी पुन्हा त्यांनी तयारी सुरु केली असताना पक्षाने आमदार सीमा हिरे यांनाच उमेदवारी दिल्याने पाटील हे नाराज झाले आहेत.

हेही वाचा…उदय सांगळे यांच्या हाती तुतारी, सिन्नरमध्ये माणिक कोकाटेंशी लढत

पाटील यांनी बंडाचे संकेत देत मंगळवारी सातपूर येथील एल. डी. पाटील शाळेत निर्धार मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते. भाजपचे किशोर घाटे, वर्षा भालेराव हे माजी नगरसेवकही उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी, पक्षासाठी आपण आजपर्यंत कशा प्रकारे काम केले, त्याची माहिती दिली. पक्षाने आजपर्यंत आपणास चार वेळा निवडणुकीत उमेदवारी करण्यापासून थांबविले. परंतु, दुसऱ्याला संधी दिली. आपण यावेळी उमेदवारी करण्याचे ठरविल्यानंतर अनेकांकडून मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला. परंतु, आता थांबणार नाही. निवडणूक लढविणारच, असा निर्धार पाटील यांनी व्यक्त केला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former bjp corporator dinkar patil vowed to contest assembly elections despite partys decision sud 02