नाशिक :दिंडोरी मतदार संघाचे भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे गुरुवारी सकाळी निवासस्थानी निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. सायंकाळी सुरगाण्यातील प्रतापगड या मूळ गावी चव्हाण यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होणार आहेत. वाजपेयी सरकार वाचविण्यासाठी रुग्णालयात दाखल असताना दिल्लीत धाव घेणारे खासदार अशी त्यांची ओळख होती.
चव्हाण हे काही दिवसांपासून आजारी होते. निधनाची माहिती समजताच भाजपसह विविध राजकीय पक्ष आणि आदिवासी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी नाशिक येथील कॉलेज रोडवरील त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. विज्ञान शाखेचे पदवीधर असणारे चव्हाण मूळचे काँग्रेस कार्यकर्ते होते. प्रतापगड ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. जिल्हा परिषद सदस्य आणि सलग १५ वर्षे त्यांनी समाजकल्याण सभापती म्हणून काम केले. १९९५ मध्ये सुरगाणा-पेठ मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून ते निवडून आले. पुढील काळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर नशीब अजमावले. पण विधानसभेत ते पराभूत झाले. नंतर भाजपमध्ये प्रवेश केला.
हेही वाचा…नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
२००४ मध्ये तत्कालीन मालेगाव लोकसभा मतदारसंघातून ते भाजपच्या तिकीटावर पहिल्यांदा खासदार झाले. पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आलेल्या दिंडोरी या नव्या लोकसभा मतदारसंघाचे त्यांनी २००९ आणि २०१४ मध्ये प्रतिनिधित्व केले. २०१९ मध्ये भाजपने तिकीट नाकारल्यामुळे ते पक्षापासून काहीसे दुरावले. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवारी केली होती. परंतु, भाजपच्या नेत्यांनी मनधरणी केल्यामुळे त्यांनी माघार घेतली होती.
हेही वाचा…मविआवर महाराष्ट्राचा सौदा केल्याचा चित्रा वाघ यांचा आरोप
१९९९ मध्ये अपघातात जखमी झाल्यामुळे ते नाशिक येथील रुग्णालयात उपचार घेत होते. त्यावेळी वाजपेयी सरकारवरील अविश्वास ठरावावरील मतदानासाठी ते हवाई रुग्णवाहिकेने दिल्लीत पोहोचले होते. त्यांनी मतदान करूनही एका मताने वाजपेयी सरकार पडले होते. चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.