नाशिक : जनहितासाठी कार्यरत संजय पांडे विचार मंच आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात किमान १० जागा लढणार असल्याची माहिती राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी येथे दिली. राष्ट्रीय जनहित पक्षाच्या नावाने नोंदणी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. देवळाली मतदारसंघात शामराव भोसले यांची उमेदवारीही त्यांनी जाहीर केली.

पांडे हे दोन वर्षांपूर्वी मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन निवृत्त झाले. भारतीय टेलिग्राफ कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करून एनएसई कर्मचाऱ्यांचे दूरध्वनी अभिवेक्षण करण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पांडे यांना अटक केली होती. नाशिक दौऱ्यावर आलेल्या पांडेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रीय जनहित पक्ष असे पक्षाचे नाव निश्चित करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाकडे नोंदणीची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी चाचपणी सुरू आहे.

हेही वाचा…नाशिक : जलतरण स्पर्धेवेळी विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू, शार्दुल पोळ मूळ पुण्याचा रहिवासी

१० जागांवर उमेदवार उभे करण्याची योजना असून संभाव्य उमेदवारांना भेटत असल्याचे त्यांनी सूचित केले. देवळाली मतदारसंघातून शामराव भोसले यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. मंगेश भोईर विरारमधून आणि आपण वर्सोव्यातून निवडणूक लढणार असल्याचे ते म्हणाले. शासकीय व खासगी सेवेतील कर्मचाऱ्यांसा्ठी विचार मंच काम करणार आहे. संबंधितांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. शासकीय सेवक व त्यांच्या कुटुंबियांच्या पाठिशी उभे राहणे हे पक्षाचे ध्येय आहे. आमचा पक्ष धर्मनिरपेक्ष विचारधारेने काम करणार आहे. या विचारधारेशी संबंधित अन्य पक्षांशी चर्चा सुरू असल्याचे पांडे यांनी सांगितले.

Story img Loader