लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: महिलेस गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्या प्रकरणी शिवसेना (शिंदे गट) विद्यार्थी सेनेचा जिल्हाप्रमुख किरण फडोळला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे, संशयित फडोळने विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख आणि पक्ष सदस्यत्वाचा आधीच राजीनामा दिला असल्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
संशयित किरण बाळासाहेब फडोळ (३३, मुंगसरा, ता. नाशिक) याने व्यवसायासाठी पीडितेची जागा भाडेतत्वावर घेतली होती. थकीत भाड्याची रक्कम देणार असल्याचे सांगत संशयिताने महिलेला महात्मानगर येथील एका हॉटेलवर बोलावून घेतले. कॉफीतून गुंगीचे औषध देत संशयिताने हे कृत्य केले. यावेळी काढलेले अश्लिल छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात बलात्कारासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रात्रीच फडोळला अटक केली. बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
हेही वाचा… मनपा प्रवेशव्दाराला कुलूप लावणार, अधिकाऱ्यांना काळे फासणार- आमदार फारुक शहा यांचा इशारा
दरम्यान, संशयित फडोळ हा शिवसेना (शिंदे गट) विद्यार्थी सेनेचा जिल्हाप्रमुख होता. बलात्काराच्या गुन्ह्यात त्याचे नाव आल्यानंतर शिवसेनेने त्याच्याशी कुठलाही संबंध नसल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न केला. २३ तारखेला फडोळने वैयक्तिक कारणास्तव आपल्या पदाचा व पक्षाचा राजीनामा दिल्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविल्याची माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिली.