शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील जल प्रदुषणाकडे लक्ष वेधत माजी महापौर दशरथ पाटील यांनी जलपूजनास विरोध दर्शविला आहे. याबाबत महापालिका आयुक्तांना त्यांनी निवेदन दिले आहे. महापालिका प्रशासनाच्या वतीने मंगळवारी गंगापूर धरणात जलपूजन होणार असतांना पाटील यांनी महापालिका प्रशासनाने पूजन करणे टाळावे, अशी मागणी केली आहे.
हेही वाचा >>> नाशिक: प्रलंबित मागण्यांसाठी आशा गटप्रवर्तकांचा मोर्चा
गंगापूर धरणातून नाशिक शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. सध्या धरणात शेवाळ आलेल्या पाण्याचे तरंग, मलमूत्र आणि मलवाहिनीतून वाहणाऱ्या पाण्यासारखा धरणाच्या कडेला तरंग दिसत असल्याकडे पाटील यांनी लक्ष वेधले आहे. हे सर्व पिण्याच्या पाण्यात मिसळत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. गंगापूर धरण नैसर्गिक पावसाने भरलेले असल्याने प्रथम स्वच्छ व निर्मळ पाणी देऊन नाशिककरांच्या आरोग्यास प्राधान्य देण्यात यावे, त्यानंतरच महापालिका प्रशासनाने जलपूजनाचा कार्यक्रम करावा, असे पाटील यांनी म्हटले आहे. प्रदूषण नियंत्रण विभाग, जलसंपदा, पाटबंधारे विभाग, नाशिक महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण, नगररचना ग्रामीण, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, पंचायत समिती यांनाही पाटील यांनी यासंदर्भात पत्र पाठविले आहे.