नाशिक – उद्धव ठाकरे यांच्याशी आपली भेट होऊ नये म्हणून खासदार संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांनी प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटातून बाहेर पडलेले माजी मंत्री बबन घोलप यांनी केला आहे. घोलप हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार असून त्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली.
बबन घोलप हे लोकसभेसाठी शिर्डी मतदारसंघातून ठाकरे गटाकडून इच्छुक होते. परंतु, उमेदवारी मिळणार नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी फेब्रुवारी महिन्यात उपनेतेपदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर दोन महिने थांबून घोलप यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यादरम्यान, उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी घोलप हे इच्छुक होते. ठाकरे यांनी समजूत काढली असती तर कदाचित घोलप हे ठाकरे गटातच थांबले असते, अशी चर्चा होती. उद्धव ठाकरे यांची भेट होऊ न देण्यामागे राऊत आणि नार्वेकर यांचे प्रयत्न कारणीभूत ठरल्याचा थेट आरोप घोलप यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.
हेही वाचा – नाशिकमध्ये महायुतीत अचानक शांतता
घोलप हे सुमारे ३० वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय होते. घोलप यांनी देवळाली विधानसभा मतदारसंघात सलग पाच वेळा विजय मिळवला आहे. घोलप यांचे पुत्र योगेश घोलप हे देखील देवळाली मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. घोलप यांची कन्या तनुजा या नाशिकच्या महापौर राहिल्या आहेत. त्यांची दुसरी मुलगी तनुजा घोलप यांनी मागील महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला. योगेश घोलप यांनी मात्र अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.