लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव : काही वर्षांपासून शहराची अवस्था वाईट झाल्याचे पाहून सर्वांना दुःख होत आहे. मलाही दुःख होत आहे. आता कुणीतरी येऊन विकास करावा. परमेश्वरच सर्वांचा वाली आहे, अशी भावना माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी व्यक्त करत सध्याच्या राज्यातील राजकारणाची स्थिती उत्साहवर्धक व चांगली नसल्याचे सूचक वक्तव्यही केले.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराजनगरमध्ये जैन यांनी सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजक योजना अर्थात एसडी-सीडमार्फत उच्चशिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या श्रीमती प्रेमाबाई भिकमचंदजी जैन उच्चशिक्षण शिष्यवृत्ती वितरण सोहळ्यासंदर्भात माहिती देण्यासाठी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी जळगाव शहरासह राज्याच्या राजकारणावर भाष्य केले. ते म्हणाले की, १९८० पासून आपण शहराच्या विकासाला सुरुवात केली. १९८५ मध्ये नगरपालिकेच्या राजकारणात आलो. त्यावेळी चांगला संचही होता. त्यांच्या माध्यमातून चांगले काम करू शकलो. आता त्या संचातील सर्व जुने इकडे-तिकडे गेले आहेत. त्यामुळे आता राजकारणात रस राहिलेला नाही.
आणखी वाचा-नाशिक: मस्ती करतो म्हणून बालकाला चटके
शहराचा विकास करायचा असेल, तर नेतृत्व, नियंत्रण आणि दिशादर्शन या तीन गोष्टी फार आवश्यक असतात. २००४ पर्यंत शहराची चांगली प्रगती झाली. त्यानंतर विकासाची गाडी थांबली आहे, ती पुढे काढणे अडचणीचे आहे. वरच्याला सर्वांची काळजी आहे. शहरातील सर्वांचा परमेश्वरच वाली आहे, असे जैन यांनी सांगितले. आपल्या दोन्ही मुलांपैकी एक मुंबईत, तर दुसरा दुबईत असतो. मुले एसडी-सीडच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात सेवा बजावत आहेत. त्यामुळे पुढे कोणी आपला राजकीय वारस असेल, असे वाटत नाही, असे त्यांनी सांगितले. महापालिका शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. सद्यःस्थिती या शाळांची दयनीय अवस्था आहे, या प्रश्नावर माजी मंत्री जैन यांनी एसडी-सीडच्या माध्यमातून मदत करण्याची ग्वाहीही दिली.