लोकसत्ता वार्ताहर

धुळे : काँग्रेस पक्षातंर्गत वाद नवीन नाहीत. विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या काँग्रेसमधील स्थानिक पातळीवरील वाद शमतील, असे वाटत असताना धुळे येथे काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव काझी मोहम्मद निजामुद्दीन यांच्या उपस्थितीत वाद उफाळून आले. बैठकीत माजी आमदार डी. एस. अहिरे आणि कार्यकर्त्यांमधील वाद इतका विकोपाला गेला की, दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले. दोघांनी शिवीगाळ केली. अखेर राष्ट्रीय सचिव निजामुद्दीन यांना मध्यस्थी करावी लागली.

धुळे येथील काँग्रेस भवनात बुधवारी राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव काझी निजामुद्दीन यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानसभा निवडणूक तयारीच्या आढाव्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीला धुळे शहर, साक्री, शिंदखेडा, शिरपूर,धुळे ग्रामीण या विधानसभा मतदारसंघांमधील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी साक्रीचे माजी आमदार डी. एस. अहिरे यांनी त्यांच्या उमेदवारीच्या काळात साक्री मतदारसंघांत कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवाराला मदत केल्याचा उल्लेख केला. त्यानंतर वादाला सुरुवात झाली.

आणखी वाचा-कापूस, तूर पिकांच्याआड गांजाची शेती

स्वतः अहिरे हे कार्यकर्त्यावर धावून गेल्याने दोघांमध्ये शिवीगाळ झाली. यामुळे हा वाद झोंबाझोंबीपर्यंत जाण्याची शक्यता निर्माण झाली. राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांसमोर अधिक शोभा नको म्हणून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांच्यासह उपस्थित पदाधिकारी, नेत्यांनी मध्यस्थी आणि सारवासारव केली. पक्षाचे सचिव निजामुद्दीन यांनी स्वतः पुढे येत कार्यकर्त्यांची समजूत घातली. अनेक दिवसांपासून काँग्रेसमधील अंतर्गत वाद चर्चेत आहेत. आजच्या घटनेतून तो जाहीरपणे चव्हाट्यावर आला.