तालुक्यातील ८४ गावे पाण्याच्या प्रतिक्षेत असतानाही जिल्हा प्रशासन अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करत माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी पाणी सोडण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे चरणस्पर्श करण्याचा प्रयत्न केला. वेळीच शर्मांनी मागे होत पाटलांना सावरले. लवकरच पाणी सोडण्याचे आश्वासन जिल्हाधिकार्यांनी यावेळी दिले. या संदर्भात प्रा. पाटील यांनी भूमिका मांडली. अक्कलपाडा धरणातून आवर्तन सोडण्यासंदर्भात प्रशासनाला वारंवार विनंत्या करुन थकलो आहे.
हेही वाचा >>> नाशिक: आजपासून नाफेडकडून कांदा खरेदी; राज्यात तीन लाख मेट्रिक टनची खरेदी होणार
पाण्यासाठी बळीराजा तळमळतोय, तरी प्रशासनाकडून उचित कार्यवाही होत नाही. दुसरीकडे सत्ताधारी वाडीशेवाडी सारख्या प्रकल्पांमधून मनमर्जीप्रमाणे आपल्या मतदारसंघात पाण्याची व्यवस्था करतात. विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना मुद्दामहून वेठीस धरले जाते. अक्कलपाड्यातील उपलब्ध २७०० द.ल.घ.फू जलसाठ्यापैकी आम्ही केवळ २५० ते ३०० द.ल.घ.फू पाण्याची मागणी करत आहोत. तरीही जिल्हाधिकारी जलज शर्मा असंवेदनशीलता दाखवित आहेत, असा आरोप प्रा.पाटील यांनी केला. दोन दिवसात अक्कलपाडा धरणातून पाणी न सोडल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही प्रा.पाटील, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, कैलास पाटील, प्रकाश वाघ यांच्यासह कळंबू येथील राज राजपूत, मिलींद भावसार (अजंदे), बापू बडगुजर (मुडी), विकास बावरा (बोदडे), रतिलाल पाटील (अजंदे) आदींनी दिला आहे.