लोकसत्ता वार्ताहर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मालेगाव : धुळे लोकसभा मतदार संघातून पक्षाने उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेले नाशिक जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत रविवारी धुळे येथे हा पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी डॉ. शेवाळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याची स्तुती केली. निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याने काँग्रेसने शेवाळे यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे.

शेवाळे हे धुळ्यातून लोकसभेसाठी इच्छुक होते. काँग्रेसने त्यांना उमेदवारी न देता नाशिकच्या माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांच्यावर विश्वास दर्शवत त्यांना निवडणूक रिंगणात उतरविले. त्यामुळे शेवाळे आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली होती. या नाराजीतूनच पाच वर्षे नाशिक जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळणाऱ्या शेवाळे यांनी पक्षश्रेष्ठींकडे पदाचा राजीनामा दिल्यावर शेवाळे यांचा राजीनामा तत्काळ मंजूर करुन चांदवडचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांची त्यांच्या जागेवर नियुक्ती केली गेली. त्यामुळे शेवाळे आणि समर्थकांमधील नाराजीत भर पडत गेली. चार महिन्यांपूर्वी मालेगाव दौऱ्यावर आलेले बावनकुळे हे शेवाळे यांच्या निवासस्थानी धडकले होते. भाजप प्रदेशाध्यक्षांची स्वारी काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या घरी गेल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली होती. नाराजीनाट्यानंतर शेवाळे हे भाजप प्रवेश करतील, अशी चर्चा रंगू लागली होती. ती वास्तवात उतरली.

आणखी वाचा-प्रवेशासाठी लाच घेणारे मुख्याध्यापक, उपशिक्षक जाळ्यात

धुळे लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात शेवाळे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ.राजेंद्र ठाकरे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी भाजप प्रवेश केला. यावेळी शेवाळे यांनी १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामामुळे देश प्रगतीपथावर जात असून त्यामुळेच आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची भावना मांडली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former nashik district president of congress dr tushar shewale in bjp mrj