नाशिक : माजी पंतप्रधान आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे नेते एच.डी. देवेगौडा यांनी मुलगा तथा केंद्रीय अवजड उद्योगमंत्री कुमारस्वामी तसेच कुटूंबातील इतर सदस्यांसह शनिवारी पंचवटीतील श्री काळाराम मंदिर आणि त्र्यंबकेश्वर येथे पूजन केले. यावेळी देवेगौडा यांचा कर्नाटकमधील लैंगिक अत्याचार प्रकरणात जामिनावर असणारा दुसरा मुलगा एच.डी. रेवण्णाही उपस्थित होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याच प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात पंतप्रधानांचे नातू, तथा जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) निलंबित नेते प्रज्वल रेवण्णा यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. माजी पंतप्रधान देवेगौडा हे दोन मुलगे, नातू कन्नड अभिनेता निखील कुमारस्वामी, त्यांची पत्नी रेवती, पणतू अव्यांगदेव यांच्यासह नाशिक आणि त्र्यंबकेश्वर नगरीत दर्शनासाठी आले होते. कुटूंबियांचा हा खासगी दौरा असून कुठलेही राजकीय भाष्य करणार नसल्याचे देवेगौडा यांंनी स्पष्ट केले.

हेही वाचा…महाराष्ट्र पोलीस अकादमीतून पाच अनाथ मुले उपनिरीक्षक, आरक्षणासह तर्पण फाउंडेशनच्या पालकत्वाचे फलित

नाशिक हे प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी श्रीराम, लक्ष्मण आणि सीता हे वास्तव्यास होते. त्यामुळे नाशिकला वेगळे महत्व असून या ठिकाणी भेट देऊन समाधान वाटल्याचे त्यांनी सांगितले. पंचवटीतील श्री काळाराम मंदिर आणि त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रत्येकी अर्धा तास त्यांनी पूजाविधी केले. कुमारस्वामी हे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर श्रीरामाच्या दर्शनाला येणार असल्याचे देवेगौडा यांनी म्हटले होते. त्यानुसार त्यांनी दर्शन घेऊन संकल्पपूजन केल्याची माहिती महंत सुधीरदास पुजारी यांनी दिली. नियोजित दौऱ्यात देवेगौडा हे नाशिकरोडच्या मुक्तिधाम मंदिरासही भेट देणार होेेते. परंतु, विलंब झाल्यामुळे मुक्तिधामला ते गेले नाहीत, असे जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांनी सांगितले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former prime minister h d deve gowda along with his family performed pooja at sri kalaram temple and trimbakeshwar sud 02