नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) घुसमट होत असताना ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची भाजपशी जवळीक वाढली आहे. त्यातच नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर येथे राम मंदिराच्या जीर्णोध्दार सोहळ्यानिमित्त एकत्र आलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जौशी आणि छगन भुजबळ यांनी एकमेकांवर स्तुतीसुमने उधळली.नांदूरमध्यमेश्वरचे राममंदिर पुरातन आहे.

जोशी यांचे आजोळ असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार केला जाणार आहे.. शासनाने यासाठी दोन कोटी रुपये दिले आहेत. मंदिर जीर्णौध्दार भूमिपूजनासाठी भय्याजी जोशी आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ उपस्थित होते. या दोघांनी श्रीरामाची आरती केली. यावेळी भुजबळ यांनी भय्याजी यांच्या कार्याचे कौतुक केले. भय्याजी यांनी अनेकांना संस्कारी, धार्मिक बनवले. भय्याजी या ठिकाणी आल्यामुळे आपणही आलो. भय्याजी यांचे नाव भारतभर आहे. जिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तिथे त्यांचे नाव आहे. या तीर्थस्थळाला नावारूपाला आणण्याचा विश्वास भय्याजींनी व्यक्त केल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

अहिल्यादेवींनी उभारलेली मंदिरे जपण्याची गरजही त्यांनी मांडली. अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या या मंदिरात श्रीराम, लक्षण, सीता, हनुमान यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या सुशोभिकरणासाठी दोन कोटींचा निधी मंजूर आहे. कोटमगाव, नस्तनपूर, टाकेद या तीर्थस्थळांच्या सुशोभीकरणाचे काम करण्यात येत आहे, असे भुजबळ यांनी नमूद केले. भय्याजी यांनी, भुजबळ हे रामभक्त असल्याने या ठिकाणी आल्याचे सांगितले. भुजबळ हे मोठ्या शक्तीचे प्रतीक आहेत. ते बरोबर आल्याने मंदिराचे काम अधिक मोठे होईल. त्यांच्या मदतीमुळे आभार व्यक्त करतो, असे सांगितले.

Story img Loader