नाशिक: नाशिकचा संदर्भकोष अशी ओळख निर्माण करणारे सार्वजनिक वाचनालय नाशिकचे माजी अध्यक्ष तसेच शहरातील विविध संस्थांशी संबंधित मधुकर झेंडे (८८) यांचे शनिवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले.
महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतरही सुमारे १० वर्षे ते मानद अधिकारी म्हणून कार्यरत होते. तत्कालीन नशिक नगरपालिका तसेच १९८२ पासून स्थापित झालेल्या महानगरपालिकेच्या अनेक स्थित्यंतरांचे झेंडे हे साक्षीदार राहिले. नाशिककरांमध्ये ते मधुकरअण्णा म्हणून प्रसिध्द होते. सार्वजनिक वाचनालय नाशिक या संस्थेच्या प्रगतीत त्यांचा सिंहाचा वाटा होता.
२००८ ते २०१२ या कार्यकाळात त्यांनी सावानाचे अध्यक्षपद भूषविले. याशिवाय महाकवी कालिदास कलामंदिराच्या स्थापनेत महत्वपूर्ण भूमिका बजाविणाऱ्या झेंडे यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नाशिक शाखा अध्यक्षपद, वसंत व्याख्यानमालेचे कार्याध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. लोकरंजन कलाकेंद्राची स्थापना करून अनेक कलावंतांना घडविण्याचे काम केले.
लोकहितवादी मंडळ, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड यासारख्या अनेक सामाजिक संस्थांशी झेंडे यांचा निकटचा संबंध होता. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, जावई, सून, नातू, पणतू असा परिवार आहे.