लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : शहरातील अमरधाम रस्ता भागात टोळक्याने मालवाहू वाहन अडवून चाकुचा धाक दाखवत चालकास लुटले. त्याच्या खिशातील अडीच हजार रुपये बळजबरीने काढून पलायन केले. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
याबाबत भूषण चौधरी (४४, रविवार कारंजा ) यांनी तक्रार दिली. सुरमा उर्फ शाहरुख शहा (नानावली), साबीर शहा (सादिकनगर, वडाळा), आवेश खान आणि असलम खान (दोघे नानावली) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. चौधरी सोमवारी मालवाहतूक करणारे वाहन घेऊन जुन्या नाशिक भागात गेले होते. नानावलीतील गुलशाबाबा दर्गा परिसरातून ते अमरधाम रस्त्याकडे जात असताना टोळक्याने वाहन रोखले. चाकुचा धाक दाखवत खिशातील अडीच हजाराची रोकड बळजबरीने काढून पलायन केले. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे अनेक लुटमारीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग
नेहरू गार्डन भागात रिक्षातून आलेल्या टवाळखोरांनी शाळेतून घरी परतणाऱ्या १४ वर्षाच्या मुलीची वाट रोखत विनयभंग केला. पीडित मुलगी सोमवारी दुपारी शाळेतून नातेवाईकांच्या घराकडे पायी निघाली होती. रिक्षातून आलेल्या दोघांनी तिचा पाठलाग केला. नेहरू गार्डन परिसरात वाट अडवून एकाने तिच्याकडून पेन घेऊन भ्रमणध्वनी क्रमांक असलेली चिठ्ठी तिला देण्याचा प्रयत्न केला. पीडितेने चिठ्ठी घेण्यास नकार दिल्याने रिक्षातील दुसऱ्या संशयिताने भ्रमणध्वनीत मुलीचे छायाचित्र काढले. ही बाब मुलीने पालकांसह शिक्षकांकडे कथन केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात विनयभंग व पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बस स्थानकात सोनसाखळी लंपास
मुंबई नाका भागातील महामार्ग स्थानकात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी लंपास केली. अर्जुन वाघचौरे (दत्तचौक, सिडको) यांनी तक्रार दिली. वाघचौरे दाम्पत्य कल्याण येथे जाण्यासाठी महामार्ग स्थानकात गेले होते. नाशिक-कल्याण बसमध्ये चढत असताना गर्दीची संधी साधत चोरट्यांनी वाघचौरे यांच्या गळ्यातील सोन्याचा गोफ लांबविला. या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.