नाशिक – ओझर येथे घरफोडी करून चारचाकी वाहन चोरी करणाऱ्या टोळीतील चौघांना नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडून १२ तासात अटक करण्यात आली. संशयितांकडून सहा लाख ३२ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ओझर येथील स्वामी समर्थ नगरातील रहिवासी हरेकृष्णा साहु हे कुटूंबासमवेत बाहेरगावी गेले असतांना शनिवारी रात्री चोरट्यांनी त्यांचे बंद घराचे कुलूप तोडून दागिने, घड्याळे, कॅमेरा, लॅपटॉप, मायक्रोओव्हन असा दोन लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल तसेच घराबाहेर उभी असलेली मोटार असा पाच लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला. याबाबत ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे करत असतांना गुन्ह्यात चोरीस गेलेली मोटार सटाणा परिसरात काही जण घेवून येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सटाणा ते मालेगाव रोड तसेच उंबरदे गाव परिसरात सापळा रचला. विनानंबरची संशयित मोटार दिसताच पाठलाग करुन संशयितांना ताब्यात घेतले. शिवाजी उर्फ शिवा मालखेडे (२२, रा. मोरेमळा, पंचवटी), सागर जगताप (रा. आडगाव शिवार), संजय पहाडे मी (२०, रा. गंगापूर रोड), तुषार जाधव (२०, रा. तारवाला नगर) ही ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. महेश मालखेडे (रा. मोरेमळा, पंचवटी) हा फरार आहे.

दरम्यान, तपासी पथकाने संशयितांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात चोरीस गेलेली मोटार तसेच दोन घड्याळे, रोख रक्कम असा सहा लाख ३२ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. संशयित शिवाजी मालखेडे हा नोंदीतील सराईत गुन्हेगार असून तो वेगवेगळ्या टोळ्या तयार करुन घरफोडी, चोरीचे गुन्हे करत असतो. संशयितावर नाशिक ग्रामीण, नाशिक शहर आयुक्तालय हद्दीत चोरी, घरफोडी असे गुन्हे दाखल आहेत.

Story img Loader