लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या जाहीर प्रचाराचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेने झाला खरा, परंतु, यावेळी जिल्ह्यातील महायुतीचे चार उमेदवार अनुपस्थित राहिल्याने वेगळीच चर्चा रंगली. यातील दोन उमेदवारांना पोहोचण्यास विलंब झाला. तर एक जण मतदारसंघातील मेळाव्यात अडकले होते. देवळाली मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार म्हणून राष्ट्रवादीच्या (अजित पवार) सरोज अहिरे यांना व्यासपीठावर स्थान मिळाले. यामुळे शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) राजश्री अहिरराव यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तपोवन येथील मैदानात जाहीर सभा झाली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे (अजित पवार) मंत्री छगन भुजबळ, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह महायुतीचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. सभेत महायुतीचे १४ मतदारसंघातील अधिकृत उमेदवार व्यासपीठावर उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, प्रत्यक्षात केवळ १० उमेदवार सभेस उपस्थित राहिले. मालेगाव बाह्यचे उमेदवार दादा भुसे, चांदवडचे डॉ. राहुल आहेर, दिंडोरीचे नरहरी झिरवळ आणि नांदगावचे उमेदवार सुहास कांदे सभेत उपस्थित नव्हते. मोदी यांची आधी धुळे येथे सभा झाली होती. भुसे हे तेथील सभेला उपस्थित होते. त्यामुळे ते नाशिकला आले नाहीत. अधिकृत उमेदवारांच्या अनुपस्थितीविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत.
आणखी वाचा-सुरगाण्याची अतिमागास प्रतिमा बदलणार, धनंजय मुंडे यांचे आश्वासन
नांदगावमध्ये महायुतीचे उमेदवार सुहास कांदे यांच्यासमोर अजित पवार गटाचे माजी पदाधिकारी समीर भुजबळ यांनी बंडखोरी केली आहे. चांदवडमध्ये भाजपचे उमेदवार डॉ. आहेर यांनाही बंधू तथा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या बंडखोरीला तोंड द्यावे लागत आहे. उमेदवारांच्या अनुपस्थितीबाबत भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी दादा भुसे हे धुळ्यातील सभेत उपस्थित राहिल्याचे नमूद केले. चांदवडचे उमेदवार राहुल आहेर हे मतदारसंघातील मेळाव्यामुळे येऊ शकले नाहीत. नरहरी झिरवळ आणि सुहास कांदे यांना पोहोचण्यास विलंब झाला. तत्पूर्वीच मोदी यांचे व्यासपीठावर आगमन झाले होते. त्यामुळे त्यांना व्यासपीठावर जाणे शक्य नसल्याने ते माघारी गेल्याचे सांगण्यात आले. जाहीर सभेसाठीचा खर्च राजकीय पक्षाकडून केला जातो. त्यामुळे उमेदवारांच्या खर्चात तो समाविष्ट होत नाही, याकडे लक्ष वेधले जात आहे.
देवळालीतून सरोज अहिरे व्यासपीठावर
पंतप्रधान मोदी यांच्या जाहीर सभेत देवळाली मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार म्हणून राष्ट्रवादीच्या (अजित पवार ) सरोज अहिरे या उपस्थित होत्या. या मतदारसंघात अजित पवार गटाविरोधात शिवसेनेने (एकनाथ शिंदे) राजश्री अहिरराव यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या जागेवर महायुतीचे दोन अधिकृत उमेदवार आहेत. सभेत व्यासपीठावर कोण असणार, याबद्दल उत्सुकता होती. या सभेपूर्वीच शिवसेना शिंदे गटाकडून निर्णय होणे अपेक्षित होते. तो वरिष्ठांकडून जाहीर केला जाईल, असे सांगितले गेले. परंतु, सभेतील व्यासपीठावर शिंदे गटाच्या उमेदवाराच्या अनुपस्थितीने या प्रश्नाचे उत्तर मिळाल्याचे अजित पवार गटाकडून सांगितले जात आहे.
आणखी वाचा-बालमृत्यू टाळण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे न्यूमोनियाविरोधात विशेष मोहीम
पंतप्रधानांकडून स्थानिक मुद्यांना स्पर्श
कांदा निर्यातीसाठी धोरणात बदल करण्यात आले. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, होणाऱ्या पायाभूत सुविधांच्या कामातून नाशिकचा विकास होईल. नाशिक आयटी पार्कमधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, याकडे लक्ष वेधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थानिक विषयांचा उल्ले्ख केला. संरक्षण सामग्री निर्मितीत नाशिकचा मोठा वाटा आहे. एचएएलकडून लढाऊ विमानांची निर्मिती केली जाते. या उद्योगाविषयी काँग्रेस आणि आघाडीच्या लोकांनी खोट्या अफवा पसरविण्याचे काम केले. आज ही कंपनी विक्रमी नफा कमवित असल्याचे मोदी यांनी सांगितले.