जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात बुडाल्याने चार जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतांमध्ये चार वर्षाच्या बालकाचाही समावेश आहे. राजेंद्र गवळी (३२, रा. मोरवाडी) हा पाय घसरून विहिरीत पडला. नाकातोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दुसरी घटना दारणा नदीपात्रात घडली.
हेही वाचा >>> मालेगाव: पावणेदोन कोटी वसुलीसाठी रावळगाव चॉकलेट कारखान्यावर कारवाई
अहिल्या नाठे (१४) ही आई योगिता आणि चुलते भास्कर नाठे यांच्या सोबत गोधड्या धुण्यासाठी दारणा धरणाच्या खालील बाजूस नदीपात्रात गेली होती. अंघोळीसाठी पाण्यात उतरली असता पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडाली. तिला पाण्यातून बाहेर काढून नाशिक जिल्हा रुग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तिसरी घटना दिंडोरी तालुक्यात घडली. दिंडोरी येथे आजोळी आलेला दिशांत गोवर्धने (चार) हा मोहाडी गावाजवळील स्मशानभूमी लगत असलेल्या मोकळ्या परिसरात खेळत होता. खेळतांना सार्वजनिक विहिरीतील पाण्यात पडला. त्याला दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. चौथ्या घटनेत हौशाबाई भांगरे (७०, रा. भोरमळा) या रात्री घराबाहेर पडल्या. अंधारात अंदाज न आल्याने त्या विहिरीत पडल्या. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात नाेंद करण्यात आली आहे.