लोकसत्ता वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मालेगाव: गेल्या एप्रिल महिन्यात झालेल्या येथील बाजार समितीच्या निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवत प्रशासक जितेंद्र शेळके यांनी समितीच्या चार कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यामुळे निवडणुकीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भाग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

पालकमंत्री दादा भुसे भुसे व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे या दोन गटात समितीच्या निवडणुकीसाठी सामना रंगला होता. त्यात हिरे गटाने दणदणीत विजय मिळवला असून भुसे गटावर पराभवाची नामुष्की ओढवली आहे. भुसे यांचे एकेकाळचे खंदे समर्थक व जाणता राजा मित्र मंडळाचे संस्थापक बंडू बच्छाव हे भुसेंपासून दुरावले आहेत. या वेळच्या निवडणुकीत बच्छाव यांनी हिरे गटाची पाठराखण केल्याचे दिसून आले.

आणखी वाचा-जळगावमध्ये आतापर्यंत पाच जणांचा उष्माघाताने मृत्यू

बच्छाव यांचे निकटवर्तीय असलेले समितीचे कर्मचारी योगेश पवार यांच्या विरोधात निवडणूक आचारसंहिता भंग केल्याची तक्रार विरोधकांनी केली होती. त्या अनुषंगाने गेल्या २६ एप्रिल रोजी पवार यांना निलंबित करण्यात आले होते. प्रत्युत्तरादाखल बच्छाव यांनीही समितीच्या अन्य पाच कर्मचाऱ्यांनी विरोधकांच्या प्रचारात सहभाग घेतल्याची तक्रार प्रशासक शेळके यांच्याकडे केली होती. दरम्यान,आपल्या समर्थक कर्मचाऱ्यास तात्काळ निलंबित केले तरी विरोधकांशी संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास प्रशासक शेळके हे चालढकल करत असल्याची तक्रार करत सोमवारी बच्छाव यांनी बाजार समिती कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी पाचपैकी जे तीन कर्मचारी दोषी आढळून आले त्यांनाही निलंबित करण्यात आल्याची माहिती शेळके यांनी दिली. आता निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये संकेत देवरे,शरद गोऱ्हे व प्रितेश शिंदे यांचा समावेश आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four employees of market committee suspended in case of violation of election code of conduct mrj
Show comments