लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव: भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे चार दरवाजे अर्धा मीटरने गुरुवारी सकाळी उघडण्यात आले आहेत. त्यामुळे तापी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
उन्हाळ्याच्या शेवटी धरणातील जलसाठा जेमतेम शिल्लक होता, तसेच पावसाला विलंबाने सुरुवात झाल्याने मधल्या काळात धरणावर अवलंबून असलेल्या सर्व पाणीपुरवठा योजना विस्कळित झाल्याने जलसंकटाला तोंड द्यावे लागते की काय, असा प्रश्नही निर्माण झाला होता. मात्र, उशिरा का होईना रावेर तालुक्यात व मध्य प्रदेशात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने तापी नदीला पूर आल्याने धरणात पाण्याची आवक वाढून जलसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे भुसावळ शहरासह तापी नदीवर अवलंबून असलेल्या गावांतील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. पाऊस सुरूच असल्याने पाण्याची आवक वाढत असल्याने हतनूर प्रशासनाने धरणाचे चार दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे ४८०३ क्यूसेक विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.