गंजमाळ परिसरातील घटना

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : गंजमाळ परिसरातील पंचशीलनगर येथे बुधवारी दुपारी अकस्मात लागलेल्या आगीत चार घरे भस्मसात झाली. त्यात एका महिलेचा भाजून मृत्यू झाला. या घटनेत सुमारे १५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अग्निशमन विभागाने तातडीने धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले.

दुपारी एक वाजेच्या सुमारास पंचशीलनगरमधील एका घराला आग लागली. परिसरात एकमेकांना लागून अनेक पत्र्यांची घरे आहेत. दोन घरांमध्ये लाकडी फळ्या लावून विभागणी केलेली आहे. यामुळे आग काही वेळात इतरत्र पसरली. आसपासची तीन घरे तिच्या वेढय़ात सापडले. परिसरात धुराचे साम्राज्य पसरले. या घटनेची माहिती समजल्यानंतर अग्निशमन दलाचे पाच बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. परिसरात बघ्याची मोठी गर्दी जमल्याने मदत कार्यात अडथळे येत होते. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग पूर्णपणे विझविण्यात आली.

आगीत भाजल्याने सुनीता जताळे (अंदाजे ३० वर्ष) या महिलेचा मृत्यू झाल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले. आग नियंत्रणात येईपर्यंत चारही घरातील संसारोपयोगी साहित्य भस्मसात झाले. उपरोक्त घरातील आणि आसपासच्या नागरिकांनी सुरक्षितस्थळी धाव घेतली. आगीत सुनीता आव्हाड, रामाबाई मोरे, अकील खान आणि अकबर शेख या चार जणांच्या घरातील साहित्य जळून खाक झाले. मयत सुनीता या मूळ भगूर येथील रहिवासी आहेत. आव्हाड यांच्या त्या नातेवाईक आहेत. दिवाळीनिमित्त त्या आव्हाड यांच्या घरी आल्या असाव्यात, असा अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला. आगीचे निश्चित कारणही स्पष्ट झाले नसल्याचे अग्निशमन अधिकारी आर. एम. बैरागी यांनी सांगितले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four houses were burnt in a sudden fire at panchsheel nagar in nashik