मालेगाव : गुरुवारी मालेगाव-मनमाड रस्त्यावरील कौळाणे शिवारात बस उलटून चार प्रवासी जखमी झाले. किरकोळ जखमी झालेल्या तिघांना उपचारानंतर सोडून देण्यात आले असून डोक्याला मार लागल्याने एका प्रवाश्यावर येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.पुणे-शिंदखेडा ही बस मनमाडहून मालेगावकडे येत असताना दुपारी चारच्या सुमारास अपघात झाला.
बस उलटल्यानंतर स्थानिकांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरु केले. बसमध्ये अडकलेल्या प्रवाश्यांना सुखरुप बाहेर काढले. बसमध्ये एकूण ४१ प्रवासी होते. त्यात जखमी झालेल्या प्रवाश्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ब्रेक नादुरुस्त झाल्याने ही दुर्घटना झाल्याचे सांगण्यात आले.