नाशिक – इगतपुरी तालुक्यातील घोटी- सिन्नर महामार्गावरील उंबरकोन फाट्याजवळ शुक्रवारी दुपारी झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. मोटारसायकल आणि चारचाकी वाहन यांच्यात हा अपघात झाला घोटी-सिन्नर रस्त्यावरील उंबरकोन फाट्याजवळ एका मालवाहू वाहनाने चारचाकी वाहनाला हूल दिल्याने वाहन जागीच रस्त्यावर आडवे झाले. त्याचवेळी भरधाव येणारी मोटार सायकल चारचाकीला आदळल्याने मोटारसायकलवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा >>> नंदुरबार जिल्ह्यात फराळातून ७५ जणांना विषबाधा
ऋषिकेश आगिवले (२२), टिलू आगिवले (२४), पिंटू आगिवले (२१) तिघेही राहणार भावली खुर्द, तालुका इगतपुरी, अशी त्यांची नावे आहेत. चारचाकी वाहनातील एसएमबीटी रुग्णालयातील विद्यार्थिनी वैष्णवी काशीद हिचाही मृत्यू झाला. अपघातात गंभीर जखमी मेघा शिंदे, साहिल शिंदे, भूमिका वावरे यांना घोटी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णवाहिका चालक मुजफर रंगरेज, नंदु जाधव यांनी धाव घेऊन जखमींना तातडीने घोटी येथील रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचले. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.