नंदुरबार – धडगाव तालुक्यातील गोरंबा लेगापाणी घाटात गुरुवारी सायंकाळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने खासगी वाहन दरीत कोसळून चार जणांचा मृत्यू झाला. मयतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
म्हसावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोरंबा लेगापाणी घाटात सायंकाळी खासगी प्रवासी वाहन मांडवी, गोरंबामार्गे केलापाणीकडे जात असताना लेगापाणी घाटातील वळणावरील तीव्र उतारावर चालकाचे नियंत्रण सुटले. वाहन दरीत कोसळले. या अपघातात दारासिंग चौधरी (४१) आणि धीरसिंग पाडवी (३५) दोन्ही रा. केलापाणी, धडगाव यांचा जागीच मृत्यू झाला. साबलीबाई चौधरी (३८, रा. केलापाणी) आणि कांतीलाल वसावे (३०, रा. वाडीबार मोलगी, अक्कलकुवा) यांचा म्हसावद ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला. सुनील चौधरी (चालक,रा. केलापाणी), गोविंद वळवी (रा. जुम्मट,धडगाव) हे जखमी आहेत.
हेही वाचा – मालेगावातून चोरीच्या १३ दुचाकी हस्तगत, सात जण ताब्यात
घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, शहाद्याचे दत्ता पवार, म्हसावद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजन मोरे, निरीक्षक पठाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी जखमींना सहकाऱ्यांसह बाहेर काढून म्हसावद रुग्णालयात दाखल केले. म्हसावद पोलीस ठाणे येथे घटनेची नोंद करण्यात आली आहे.