नाशिक – शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर रविवारी रात्री लोखंडी सळई घेऊन जाणाऱ्या टेम्पोवर दुसरे मालवाहू वाहन धडकल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. तर १३ जण जखमी झाले. सर्वजण नाशिक येथील रहिवासी आहेत. टेम्पोतून बाहेर आलेल्या सळई मालवाहू वाहनात शिरल्या. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – भुसावळमध्ये तरुणाच्या हत्येनंतर पाच संशयितांना अटक
हेही वाचा – नाशिक : अमली पदार्थ विक्री प्रकरणी तीन महिलांसह चौघे ताब्यात
उड्डाणपुलावरील द्वारका चौक परिसरात रात्री आठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. रात्रीच्या वेळी टेम्पोतून सळईची वाहतूक या अपघातास कारक ठरली. टेम्पोच्या मागील बाजुकडून बाहेर आलेल्या सळईंना लाल कापड वा तत्सम कुठलेही निशाण नव्हते. ही बाब अंधारात पाठीमागून आलेल्या मालवाहू चालकाच्या लक्षात आली नाही. आणि मालवाहू वाहन टेम्पोवर धडकल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगितले जाते. या अपघातात मालवाहू वाहनातील चेतन पवार, संतोष मंडलिक, अतुल मंडलिक, दर्शन घरत, आणि यश खरात (रा. सर्व सिडको आणि अंबड, नाशिक) यांचा मृत्यू झाल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
१३ जणांना शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. टेम्पोतील सळईंमुळे मालवाहू वाहनाच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. अपघातग्रस्त सिडको, अंबड भागातील कामगार असून ते एकमेकांचे नातेवाईक आहेत. निफाड तालुक्यातील धरणगाव येथे ते देव दर्शनासाठी गेले होते. परतत असताना हा अपघात झाला. अपघातामुळे मुंबईकडे जाणारा मार्ग बंद होऊन तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघातातील मृतांविषयी पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी माहिती दिली. जखमींमध्ये काही गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.