नाशिक – जुन्या भांडणाची कुरापत काढून सिडको येथे तीन ते चार जणांनी हल्ला करून युवकाची हत्या केल्याने सिडकोतील गुन्हेगारीचे उग्र स्वरुप पुन्हा उघड झाले असताना पोलिसांनी याप्रकरणी दोन विधिसंघर्षित बालकांसह चार जणांना ताब्यात घेतले आहे. होळीच्या दिवशी सायंकाळी हा धक्कादायक प्रकार घडला. गुन्हे शोध पथकाने अवघ्या आठ तासात या गुन्ह्यातील चारही संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुध्द अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुमित देवरे (२२) हा सटाणा येथे शिक्षण घेत होता. तो सिडकोतील गंगेश्वर, महाजन नगर येथील आपल्या घरी आलेला होता. सुमित आणि अरुण वैरागर हे पूर्वी मित्र होते. काही दिवसांपूर्वी गाडी लावण्यावरुन त्यांच्यात वाद झाले होते. त्याच वादातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले. गुरुवारी सायंकाळी सुमितची हत्या केल्यानंतर संशयित घटनास्थळावरून फरार झाले.

यावेळी रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीस्वाराला चाकूचा धाक दाखवत त्याच्या दुचाकीवरुन ते पळाले. पुढे गेल्यानंतर त्याला उतरवून देत दुचाकी घेऊन ते निसटले. दरम्यान, सुमित देवरे गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडला होता. माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राकेश हांडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्वतः पुढाकार घेऊन सुमितला पोलीस गाडीतून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. होळीच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले.

मोठ्या संख्येने नागरिक जमल्यामुळे पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कसरत करावी लागली. अंबड पोलिसांसह गुन्हे शोध पथकाने रात्रभर तपास करुन संशयित अरूण वैरागकर (२०, रा. फडोळ मळा), प्रसाद रेवगडे (१९, रा. डीजीपी नगर) आणि अन्य दोन विधिसंघर्षित बालकांना राणे नगर येथून ताब्यात घेतले.