मुंबई-आग्रा महामार्गावर पंचवटीत अमृतधाम चौफुलीवर शुक्रवारी सकाळी झालेल्या तिहेरी अपघातात चार जण गंभीर जखमी झाले. त्यात नऊ वर्षीय मुलीसह दोघांच्या पायाला जबर मार बसला आहे. परिसरात वारंवार अपघात होत असूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा प्रयत्न केला. त्यांच्यावर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी लाठीमार केल्याची तक्रार करण्यात आली. काँग्रेसचे नगरसेवक उद्धव निमसे यांनाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पोलीस उपायुक्त विजय चव्हाण यांच्याविरोधात निमसे यांनी तक्रार दिली.
अमृतधाम चौफुलीवर सकाळी नऊच्या सुमारास खासगी बस, मालमोटार आणि दुचाकी यांच्यात विचित्र अपघात झाला. ब्रेक निकामी झाल्याने नाशिककडून ओझरकडे जाणारी मालमोटार रस्त्यालगत उभ्या असलेल्या खासगी बसवर जाऊन धडकली. त्यात दुचाकीवरून जाणारे मजूरही सापडले. अपघातात परभणी येथील तीन जण गंभीर जखमी झाले. रस्त्याच्या कडेला उभी असणारी हनुमाननगर येथील नऊ वर्षांची निकिता खंदारे गंभीर जखमी झाली. निकितासह पंढरीनाथ ढाके यांच्याही पायाला जबर मार बसला. अपघातानंतर नागरिकांनी धाव घेऊन जखमींना तातडीने रुग्णालयात हलविले. वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे नागरिक संतप्त झाले. दरम्यानच्या काळात नगरसेवक उद्धव निमसे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त जागेवरच असल्याने व जमावाने गर्दी केल्याने मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी कोणतेही प्रयत्न केले नसल्याची तक्रार करत वाहनधारकांनी एकत्र येत पोलिसांना धक्काबुक्की केली. यावेळी पोलीस उपायुक्त चव्हाण यांनी आपणास शिवीगाळ करत मारहाण केल्याची तक्रार निमसे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जादा कुमक मागविण्यात आली. पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, रुग्णालयात आठ जखमींना दाखल करण्यात आले. त्यातील ढाके व निकिता यांची प्रकृती चिंताजनक आहे. तर इतर दोघांना प्राथमिक उपचारांनंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती अपोलो हॉस्पिटलचे डॉ. मंगेश जाधव यांनी दिली.
अमृतधाम चौफुलीवरील तिहेरी अपघातात चार जण जखमी
खासगी बस, मालमोटार आणि दुचाकी यांच्यात विचित्र अपघात झाला.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद
First published on: 12-09-2015 at 03:05 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four people were injured in triple road accident