मनमाड – लासलगाव रेल्वे स्थानकालगत सोमवारी सकाळी वीज वाहिनी (ओव्हरहेड वायर) दुरुस्त करणाऱ्या इंजिनने (टॉवर) उडवल्याने चार कर्मचाऱ्यांचा (गँगमन) मृत्यू झाला. इंजिन चुकीच्या दिशेने गेल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जाते. या घटनेनंतर संतप्त कर्मचाऱ्यांनी रेल रोको केला.
हेही वाचा – समाज माध्यमातील घटता वापर भाजपासाठी चिंताजनक
हेही वाचा – नाशिक : “सिन्नर धर्मांतर प्रकरणाची सखोल चौकशी करावी”; चित्रा वाघ यांची मागणी
सकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. खांब क्रमांक १५ ते १७ दरम्यान कर्मचारी देखभाल दुरुस्तीचे काम करीत होते. यावेळी लासलगावकडून उगावकडे निघालेले वीज वाहिनी दुरुस्तीचे काम करणारे इंजिन चुकीच्या दिशेने गेल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जाते. इंजिनच्या धडकेत गँगमन संतोष केदारे (३०), दिनेश दराडे (३५), कृष्णा अहिरे (४०) व संतोष शिरसाठ (३८) यांचा मृत्यू झाला. मृतांमधील एक जण मनमाडचा आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. संतप्त कर्मचाऱ्यांनी रेल रोको केला. गोदावरी एक्स्प्रेस २० मिनिटे रोखून धरली.