जळगाव – पाचोरा येथील महाराणा प्रताप चौकात शुक्रवारी पहाटे मुंबईकडून येणार्‍या मालवाहू जीपने श्री दत्तमंदिराच्या ओट्यावर बसलेल्यांना धडक दिली. त्यात चौघे गंभीर जखमी झाले असून, दोघांचे पाय निकामी झाले आहेत. संतप्त जमावाच्या ताब्यातून वाहनचालकासह सहचालकास वेळीच पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले.

पोलिसांच्या माहितीनुसार, मुंबई येथून बुलडाणा येथे सफरचंद, किवी, मोसंबी आदी फळे घेऊन जाणाऱ्या मालवाहू जीपने पहाटे पाचोरा येथे श्री दत्तमंदिराच्या ओट्याला जोरदार धडक दिली. या अपघातात ओट्यावर बसलेल्या दोघांच्या पायांचे तुकडे झाले. अन्य दोनजण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी धाव घेत रुग्णवाहिकेच्या माध्यमातून जखमी चौघांना खासगी रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा – “…तर नरेंद्र मोदी अडचणीत येतील”, ‘त्या’ प्रकरणाचा उल्लेख करत संजय राऊतांचा इशारा

जीपचालक तथा मालक पवन गोटी (रा. वसई), सहचालक सावन गोटी (रा. वसई) यांच्यावर संतप्त जमाव रोष व्यक्त करीत असताना सोमवंशी यांच्यासह पोलीस कर्मचारी योगेश पाटील व राहुल बेहरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश भोसले, प्रा. सी. एन. चौधरी यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले. अपघातात वसंत पाटील (४२, रा. सुरत, गुजरात), विनोद पाटील (३५, रा. पाचोरा), अमोल वाघ (२७, रा. पाचोरा), कुंदन परदेशी (१७, पुनगाव, ता. पाचोरा) हे जखमी झाले. वसंत पाटील हे शुक्रवारी खासगी बसने सुरतहून पाचोरा येथे विवाह सोहळ्यासाठी आले होते.

Story img Loader